
अजिंक्य किल्ले पारगड वरील गडाचे पहिले किल्लेदार रायबा तानाजीराव मालुसरे यांचे जगातील पहिले स्मारक
चंदगड : सी एल वृत्तसेवा
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या चंदगड तालुक्यातील ऐतिहासिक अजिंक्य किल्ले पारगडवर गडाचे पहिले किल्लेदार सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे पुत्र सुभेदार रायबा तानाजीराव मालुसरे यांच्या स्मारकाचा द्वितीय वर्धापन दिन बुधवार दि. २५ फेब्रुवारी २०२६ रोजी संपन्न होणार आहे. यावेळी तालुक्यातील विविध शासकीय विभागाचे अधिकारी, नूतन जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, सह्याद्री प्रतिष्ठान कोल्हापूरचे दुर्ग सेवक उपस्थित राहणार आहेत.
दि. २५ रोजी सकाळी नऊ वाजता छत्रपती शिवाजी महाराजांची गडावर पालखी मिरवणूक स्मारक स्थळापासून सुरू होईल. पालखी भवानी मंदिर, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, सदर, हनुमान मंदिर, गडाच्या पायऱ्यां वरील ध्वजस्तंभ मार्गावरून पुन्हा स्मारक पर्यंत येईल. यानंतर सुभेदार रायबा मालुसरे यांच्या स्मारकातील पुतळ्यास अभिषेक, पुतळा पूजन कार्यक्रमानंतर उपस्थित मान्यवरांचे स्वागत व मनोगते असा कार्यक्रम होईल. दुपारी कार्यक्रमासाठी आलेल्या सर्व शिवभक्त, दुर्ग सेवक व नागरिकांसाठी कालकुंद्री (ता. चंदगड) येथील श्री सरस्वती विद्यालयाच्या दहावी बॅच १९८१ वर्ग मित्रांच्या वतीने स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी शिवप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सह्याद्री प्रतिष्ठान कोल्हापूर गडहिंग्लज व चंदगड चे पदाधिकारी, मालुसरे परिवार, पारगड ग्रामस्थ तसेच कालकुंद्री येथील वर्गमित्र ग्रुपचे अध्यक्ष, डिजिटल मीडिया जिल्हा कार्यकारीणी सदस्य व पत्रकार श्रीकांत पाटील तसेच रायबा मालुसरे यांचे वंशज सुनील मालुसरे. प्रशांत मालुसरे आदींनी केले आहे.
No comments:
Post a Comment