आमदार शिवाजीराव पाटील यांचा चंदगड मतदार संघात अधिकाऱ्यांसह संयुक्त दौरा, प्रस्तावित विकासकामांच्या ठिकाणांची पाहणी करून घेतला सखोल आढावा - चंदगड लाईव्ह न्युज

22 February 2026

आमदार शिवाजीराव पाटील यांचा चंदगड मतदार संघात अधिकाऱ्यांसह संयुक्त दौरा, प्रस्तावित विकासकामांच्या ठिकाणांची पाहणी करून घेतला सखोल आढावा

आमदार शिवाजी पाटील (भाऊ) यांचा विकास प्रकल्पांचा सखोल आढावा — विविध ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी

क्रीडा संकुल, हेलिपॅड, आयुष हॉस्पिटल व वसतिगृह प्रकल्पांना गती देण्याच्या स्पष्ट सूचना

अधिकाऱ्यांसह संयुक्त दौरा — चंदगड मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासावर भर

मतदार संघातील प्रस्तावित जागांची पाहणी करताना आमदार शिवाजीराव पाटील, प्रांताधिकारी एकनाथ काळबांडे, तहसीलदार राजेश चव्हाण व सहकारी

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

  चंदगड विधानसभा मतदारसंघातील सर्वांगीण विकासाला गती देण्यासाठी आमदार शिवाजी पाटील (भाऊ) यांनी संबंधित शासकीय अधिकाऱ्यांसह विविध प्रस्तावित विकासकामांच्या ठिकाणांची प्रत्यक्ष पाहणी करून सखोल आढावा घेतला.

   या पाहणी दौऱ्यात क्रीडा संकुल, हेलिपॅड, आयुष हॉस्पिटल तसेच शासकीय मुलांच्या वसतिगृहांसाठी निश्चित करण्यात आलेल्या जागांना भेट देत, तेथील उपलब्ध सुविधा, भौगोलिक परिस्थिती आणि भविष्यातील गरजांचा बारकाईने अभ्यास करण्यात आला. चंदगड, कळसगादे, कोवाड, नागरदळे आणि सरोळी या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करण्यात आली.

   यावेळी आमदार शिवाजी पाटील (भाऊ) यांनी या विकासकामांमध्ये भविष्यात कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण होऊ नये, तसेच या प्रकल्पांचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचावा, यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट आणि ठोस सूचना दिल्या. नियोजन, अंमलबजावणी आणि दर्जा याबाबत कोणतीही तडजोड न करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

   या संयुक्त पाहणी दौऱ्यात प्रांताधिकारी एकनाथ काळबांडे, तहसीलदार राजेश चव्हाण, सार्वजनिक बांधकाम विभागाचे इप्तिकार मुल्ला, तालुका क्रीडा अधिकारी मनीषा पाटील, आरोग्य अधिकारी मकानदार यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. सर्व अधिकाऱ्यांकडून प्रकल्पांच्या सद्यस्थितीबाबत माहिती घेऊन तांत्रिक व प्रशासकीय बाबींवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

   या विकास प्रकल्पांमुळे चंदगड विधानसभा मतदारसंघात क्रीडा, आरोग्यसेवा, आपत्कालीन सुविधा आणि शैक्षणिक अधोसंरचनेला मोठी चालना मिळणार असून, परिसराच्या सर्वांगीण विकासाचा नवा अध्याय सुरू होणार असल्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

No comments:

Post a Comment