कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा
कालकुंद्री (ता. चंदगड) येथील ग्रामदैवत श्री कल्मेश्वर चा वार्षिक अखंड नाम सप्ताह शनिवार दि. २१ फेब्रुवारी २०२६ रोजी मंगलमय वातावरणात प्रारंभ झाला. सप्ताहाची समाप्ती २८ फेब्रुवारी रोजी महाप्रसादाने होणार आहे.
"सांब सदाशिव सांब, हर हर सांब सदाशिव सांब" च्या अखंड जयघोषात सलग सात दिवस चालणारा हा महाराष्ट्र व उत्तर कर्नाटकातील वैशिष्ट्यपूर्ण एकमेव सप्ताह समजला जातो. दरवर्षी फाल्गुन शुद्ध पंचमीचा सूर्योदय ते फाल्गुन शुद्ध द्वादशी चा सूर्योदय पर्यंत सप्ताह चालू असतो. या सप्ताहाला यंदा ९७ वर्षे पूर्ण झाली असून शतक महोत्सवाकडे वाटचाल सुरू आहे.
सप्ताह काळातील सात दिवसांत सकाळी दहा नंतर दुपारपर्यंत महिला भजन, चार ते सहा हरिपाठ, सात ते आठ ब्रह्माकुमारी यांचे प्रवचन, रात्री नऊ ते बारा कीर्तन, बारा ते पहाटे पाच पर्यंत जागर भजन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. हरिपाठ कार्यक्रमात संत निळोबा मंडळ कडलगे, कल्मेश्वर मंडळ कालकुंद्री, विठू माऊली मंडळ कंग्राळी खुर्द, सातेरी महिला ढोलगरवाडी, विठ्ठल रुक्मिणी हरिपाठ नागरदळे, अमरोळी मंडळ आमरोळी व शृंगारवाडी मंडळ यांचा हरिपाठ तर विष्णुपंत सुतार महाराज (दोनवडे), ज्ञानेश्वर लोहार महाराज (केखले), कुमारी राजनंदिनी लोहार (केखले), नंदन मोहन माळी महाराज (कुरळप), कु. सायली ताई नाटले महाराज (भुमकरवाडी), कु. अर्पणाताई जाधव महाराज (होदले) यांचे कीर्तन होणार आहे. नवसाच्या मुलांची तुला (वजन करणण्याचा कार्यक्रम) शुक्रवार दि. २७ रोजी दिवसभर चालणार आहे.
२८ रोजी सकाळी सूर्योदयला सप्ताह सांगता त्यानंतर सकाळी सात ते नऊ पालखी प्रदक्षिणा. सकाळी १० ते सायंकाळी ५ पर्यंत महाप्रसाद होणार आहे. या दिवशी रात्री नवक्रांती लोककला मंडळ लकीकट्टे यांचा सोंगी भजन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. श्रींचे दर्शन सर्व कार्यक्रम व महाप्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन श्री कल्मेश्वर अखंड नाम सप्ताह कमिटी व ग्रामस्थ कालकुंद्री यांच्यावतीने करण्यात आले आहे.



No comments:
Post a Comment