चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
“यशाची बीजे बालवयात रुजली तरच उद्याचा भारत घडतो,” या प्रेरणादायी विचारांची अनुभूती देणारा शैक्षणिक प्रोत्साहनपर कार्यक्रम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, बागिलगे येथे मोठ्या उत्साहात पार पडला. बागिलगे गावचे सुपुत्र व पुणे येथे राज्यकर अधिकारी म्हणून कार्यरत असलेले गोपाळ पाटील यांनी शाळेतील ७० विद्यार्थी व अंगणवाडीतील ३४ अशा एकूण १०४ विद्यार्थ्यांना सुमारे १७ हजार रुपयांची भरीव आर्थिक मदत देत त्यांच्या शैक्षणिक, क्रीडा व सांस्कृतिक वाटचालीस चालना दिली.
कला, क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग वाढावा, त्यांचा आत्मविश्वास बळकट व्हावा आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाची गोडी लागावी, या उद्देशाने ही मदत देण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना गोपाळ पाटील यांनी, स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवायचे असेल तर प्राथमिक शाळेपासूनच सातत्यपूर्ण अभ्यास, वाचनाची आवड आणि शिस्त अंगीकारावी, असे मार्गदर्शन केले. तसेच यशाची बीजे बालवयातच रुजवली गेली पाहिजेत, असे सांगत शिक्षकांना शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी नवनवीन उपक्रम राबविण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी चंदगड पंचायत समितीचे नूतन सभापती विलास नाईक होते. त्यांनी विद्यार्थ्यांना गणित व इतिहास विषयांतील उदाहरणांद्वारे आनंददायी शिक्षणाचा अनुभव देत, बागिलगे शाळेने प्रश्नमंजुषा व क्रीडा क्षेत्रात मिळवलेल्या उल्लेखनीय यशाबद्दल कौतुक केले. शाळेच्या गुणवत्ता व भौतिक विकासासाठी आपले भरीव सहकार्य कायम राहील, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बागिलगे गावचे सरपंच नरसू पाटील होते. यावेळी जिल्हास्तरीय प्रश्नमंजुषा व क्रीडा स्पर्धांमध्ये यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी एक हजार रुपये रोख बक्षीस देऊन गौरविण्यात आले. तसेच मार्गदर्शक शिक्षक संजय पाटील यांना रोख बक्षीस देत त्यांच्या कार्याचा सन्मान करण्यात आला. मुख्याध्यापक परशराम यरोळकर यांचाही विशेष सत्कार करण्यात आला.
यावेळी शालेय समिती अध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील, जयश्री पाटील, राजश्री पाटील, प्रियांका शिवणगेकर, शाहू पाटील, अंगणवाडी सेविका, मदतनीस, पालक, ग्रामस्थ व शालेय समिती सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी शाळेच्या वतीने गोपाळ पाटील, सौभाग्यवती श्वेता पाटील व सभापती विलास नाईक यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला.
मार्गदर्शन प्राध्यापिका सुकन्या पाटील यांनी केले. सूत्रसंचालन संजय पाटील यांनी केले तर आभार बाबुराव वरपे यांनी मानले.
हा उपक्रम ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला असून, शिक्षणातून सामाजिक परिवर्तन घडविण्याचा आदर्श वस्तुपाठ देणारा ठरला आहे.

No comments:
Post a Comment