![]() |
| मृतदेहासह नेसरी पोलीस ठाण्यासमोर आंदोलन करणारे संतप्त ग्रामस्थ व नातेवाईक |
नेसरी : सी एल वृत्तसेवा / एस के पाटील
दि.१५/१/२०२६ रोजी दुपारी नेसरी अडकूर मार्गावरील भैय्यासाहेब कुप्पेकर यांच्या वाड्यासमोर दोन कारचा भीषण अपघात झाला होता. यात अडकूर (ता. चंदगड) येथील ५ जखमींपैकी बाळंतीण सौ. सुवर्णा राहूल कुंदेकर (वय २३) हिचा मृत्यू झाल्याने अडकूर व परिसरातील ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. संतप्त अडकूर ग्रामस्थांनी मृतदेहासह नेसरी पोलीस स्टेशन येथे मोर्चा काढून 'आरोपीला अटक होईपर्यंत येथून हलणार नाही.' असा पवित्रा घेतला. नेसरी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक आबा गाढवे यांच्या निलंबनाची मागणी सुद्धा लावून धरली. परिणामी नेसरी पोलीस ठाणे परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला. अखेर गडहिंग्लजचे पोलिस उपअधिक्षक रामदास इंगवले यांनी संशयित आरोपिला अटक केले असून पोलिस उपनिरीक्षक आबा गाढवे यांचे निलंबन केल्याचे जाहिर केल्यानंतर तणाव निवळला.
![]() |
| मयत सौ. सुवर्णा राहूल कुंदेकर |
या संदर्भात पोलिसांतून व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, नेसरी - अडकूर मार्गावर कानडेवाडी गावच्या हद्दीत भैया कुपेकर यांच्या बंगल्याजवळ सुझुकी अल्टो व किया सोनिट या चारचाकी गाड्यांमध्ये दि. १५ रोजी दुपारी भीषण अपघात झाला. किया गाडीचा चालक संशयित आरोपी स्वप्नील रविंद्र रानगे (रा. कोल्हापूर) याने चुकीच्या पद्धतीने, भरधाव वेगात, निष्काळजीपणे अल्टो कारला जोराची धडक दिली. अशा आशयाची फिर्याद अल्टो चालक राहुल कुंदेकर यांनी नेसरी पोलिसात दिली आहे. या अपघातात अल्टोचा चालक फिर्यादी राहूल विजय कुंदेकर (वय ३२, रा. अडकूर, ता. चंदगड) त्यांची पत्नी सुवर्णा कुंदेकर (वय २३) सासू आरती भांबर (वय ४५, रा, हलकर्णी) मूलगा रुद्र (वय ४) व ७ दिवसांचे नवजात बालक असे ५ जण गंभीर जखमी झाले होते. या सर्वांवर गडहिंग्लज व कोल्हापूर येथील वेगवेगळ्या हॉस्पीटलमध्ये उपचार चालू आहेत. दरम्यान रात्री बाळंतीण सुवर्णा हिचा दुर्दैवी मृत्यू झाला. परिणामी ७ दिवसांचे अर्भक आईविना अनाथ झाले. तिच्या मृत्युनंतर अडकूर ग्रामस्थ व नातेवाईक आक्रमक झाले. त्यांनी संशयित आरोपीला अटक करावी, अपघातास कारणीभूत किया गाडीचे चालक तसेच टायर बदलण्यास व आरोपीला मदत करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याचे तात्काळ निलंबन करावे. यासाठी महिलेच्या मृतदेहासह नेसरी पोलिस ठाण्यावर मोर्चा काढून पोलिस प्रशासनाचा निषेध केला.
![]() |
| अज्ञातांनी जाळून टाकलेली अपघातातील 'किया' कार |
परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलिस उपअधिक्षक रामदास इंगवले यांनी गडहिंग्लजला आरोपी आणण्यात येत आहे. तसेच या प्रकरणात हलगर्जीपणा करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याचे निलंबन केल्याचे जाहिर केल्यानंतर तणाव निवळला. अडकुर येथे दुपारी वाजता मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
दरम्यान नेसरी येथे पोलिस स्टेशन समोर आंदोलन चालू असताना अपघातग्रस्त किया गाडीला अज्ञाताने आग लावली. गडहिंग्लज नगरपरिषदेचे अग्नीशामक घटनास्थळी येईपर्यंत संपूर्ण कार जळून खाक झाली होती.
आग लागण्यापूर्वी अपघातग्रस्त किया गाडीचे होमगार्डच्या बंदोबस्तात टायर बदलण्यात आले. यामागचे गौडबंगाल काय? तसेच पुरावा नष्ट करण्यासाठी या किया गाडीलाच आग लावण्यात आली की काय? असा प्रश्न नातेवाईक व ग्रामस्थांनी केला आहे.
चंदगडचे आमदार शिवाजीराव पाटील यांनी नेसरी पोलिस स्टेशनला भेट दिली. नागरिकांनी कायदा हातात घेऊ नये आरोपीना कडक शासन केले जाईल, असे आश्वासन दिले.
यावेळी पोलिस उपअधिक्षक रामदास इंगवले यांच्या मार्गदर्शनाखाली चंदगडचे पोलिस निरीक्षक विश्वास पाटील, आजऱ्याचे एपीआय नागेश यमगर यांच्यासह पोलिसांचा फौजफाटा तैनात होता. यावेळी नेसरीच्या सरपंच सौ. गिरीजादेवी शिंदे, उपसरपंच किरण दिडदुगी, जयवंतराव अडकूरकर, संग्राम अडकूरकर, बंडू रावराणे, माजी उपसभापती बबन देसाई, शंकर भेकणे, धोंडिबा नाईक, प्रकाश इंगवले, गणेश दळवी यांच्यासह अडकूर नेसरी परिसरातील ग्रामस्थ व नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



No comments:
Post a Comment