माडखोलकर महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा - चंदगड लाईव्ह न्युज

27 February 2026

माडखोलकर महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा

 


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

    येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालय येथे मराठी विभागाच्या वतीने मराठी भाषा गौरव दिन मोठ्या उत्साहात व साहित्यिक वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमास विद्यार्थी व प्राध्यापकांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. एस. डी. गोरल होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध कवी दशरथ पाटील जेलुगडेकर उपस्थित होते.

    मराठी विभाग प्रमुख प्रा. एस. व्ही. कुलकर्णी यांनी प्रास्ताविकात कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट करताना सांगितले की, मराठी भाषा ही संस्कृती, विचारपरंपरा आणि सामाजिक जाणिवांची वाहक असून विद्यार्थ्यांमध्ये भाषेचा अभिमान, साहित्याची आवड आणि सर्जनशीलता विकसित करण्यासाठी मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात येतो. नव्या पिढीने मातृभाषेच्या माध्यमातून व्यक्त होणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.

        प्रमुख पाहुणे कवी दशरथ पाटील जेलुगडेकर यांनी आपल्या प्रभावी भाषणातून मराठी भाषेचे आधुनिक काळातील महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी विद्यार्थ्यांना वाचन, लेखन आणि चिंतनाची सवय लावण्याचे आवाहन केले. भाषा जिवंत राहते ती तिच्या सातत्यपूर्ण वापरातून व सर्जनशील अभिव्यक्तीतून, असे सांगताना त्यांनी समाजातील वास्तव, ग्रामीण जीवन आणि मानवी भावविश्व यांवर आधारित स्वतःच्या विविध कविता सादर केल्या. त्यांच्या काव्यसादरीकरणाने विद्यार्थ्यांची मने जिंकली.

    अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. एस. डी. गोरल यांनी विद्यार्थ्यांनी मातृभाषेचा अभिमान बाळगून ज्ञानार्जनासोबत संस्कारमूल्ये जोपासावीत, असे सांगत अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला चालना मिळते, असे मत व्यक्त केले. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमामुळे महाविद्यालयीन परिसरात मराठी भाषेचा अभिमान, साहित्यप्रेम आणि सांस्कृतिक जाणीव दृढ झाल्याचे चित्र पाहावयास मिळाले.

    कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. ए. डी. कांबळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. जी. वाय. कांबळे यांनी मानले. या कार्यक्रमाला डॉ. एस. एन. पाटील, डॉ. एन. के. पाटील, डॉ. एस. डी. गावडे, डॉ. बी. जी. गावडे, डॉ. आर. ए. कमलाकर यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

No comments:

Post a Comment