चंदगड शहरातून शिक्षण हक्क यात्रेला प्रारंभ - तहसिलदारांना निवेदन, २८ ला कोल्हापूर येथे शिक्षण हक्क परिषेदेला उपस्थित राहण्याचे आवाहन - चंदगड लाईव्ह न्युज

26 February 2026

चंदगड शहरातून शिक्षण हक्क यात्रेला प्रारंभ - तहसिलदारांना निवेदन, २८ ला कोल्हापूर येथे शिक्षण हक्क परिषेदेला उपस्थित राहण्याचे आवाहन

शिक्षक हक्क यात्रा

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

    राज्य सरकार रोज नवेनवे शासन निर्णय करून प्राथमिक शिक्षणाची जबाबदारी झटकत आहे. हळूहळू सर्व सरकारी शाळा बंद करून अदानी अंबानीच्या ताब्यात संपूर्ण शिक्षण व्यवस्थाच देण्याचा घाट घातला आहे. संचमान्यता असेल किंवा समायोजनाच्या गोंडस नावाखाली दहा (१०) वीस (२०) पटाखालील शाळा बंद करण्याचा निर्णय असेल हे निर्णय बहुजन समाजाला त्यातही विशेषतः मुलींच्या शिक्षणाची वाट कायमची बंद करणारे आहेत. याला विरोधा दर्शविण्यासाठी चंदगड येथे आज (ता. २६) शिक्षक हक्क यात्रेला प्रारंभ झाला. 

    यावेळी निमंत्रक कॉ. संपत देसाई यांच्या नेतृत्वाखाली या यात्रेला प्रारंभ झाला. चंदगड येथील रवळनाथ मंदिर येथे एकत्र येवून कैलास कॉर्नर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील अश्वारूढ शिवपुतळ्याचे पूजन करून या यात्रेला प्रारंभ झाला. यानंतर येथील मुख्य बाजारपेठ मार्गे रॅली काढत तहसील कार्यालयाकडे पोहोचल्यानंतर तहसीलदार राजेश चव्हाण यांना शासनाच्या धोरणाचा निषेध करत विविध मागण्यांचे निवेदन सादर केले.

    यावेळी कॉ. संपत देसाई, कॉ. उदय नारकर, बळीराजा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष नितीन पाटील, विजय देवणे व सुनिल शिंत्रे यांनी आपले विचार मांडले. 

    राज्यातील २० पटसंख्येंच्या शाळा विविध कारणे देत बंद करण्याचा घाट शासनाने घातला आहे. सर्वच जिल्हापरिषदेच्या शिक्षण विभागाने त्यासाठीची माहिती तातडीने संकलित केली आहे. कांही जिल्ह्यात तर शाळा बंद करून त्यांना इतर शाळेत समायोजित सुध्दा केले जात आहे. शिक्षण विभागाच्या या निर्णयाचा तांडे, वाड्या, वस्ती आणि दुर्गम भागात असलेल्या शाळांना मोठा फटका बसणार आहे. या शाळांच्यामधून शिक्षण घेणाऱ्या दलित आदिवासी, भटके विमुक्त आणि बहुजन कष्टकरी जात वर्गातील मुला-मुलींना शिक्षणातूनच कायमचे हद्दपार केले जाणार आहे. मुलींच्या शिक्षणाची वाट या निर्णयाने कायमची बंद होणार आहे. १५ मार्च २०२४ च्या शासन निर्णयाने जिल्ह्यातील २३४ शाळा बंद पडणार आहेत. यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील सामाजिक संघटना, पालक, शाळा व्यवस्थापन समित्या यांच्या वतीने कोल्हापूर येथे २८ फेब्रुवारी २०२६ रोजी छ. शाहू महाराज समाधीस्थळी शिक्षक हक्क परिषद आयोजित केली आहे. याला सर्वच स्थरातून वाढता पाठींबा असून सर्वांनी या परिषदेला उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात  आले आहे. 

    यावेळी यावेळी दौलत साखर कारखान्याचे माजी चेअरमन गोपाळराव पाटील, राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे चंदगड तालुका अध्यक्ष संभाजी देसाई शिरोलीकर, विक्रम चव्हाण - पाटील, शिवसेनेचे नेते विजय देवणे, प्रा. सुनील शिंत्रे, प्रा. एन. एस. पाटील, प्रा. आर. पी. पाटील, कोल्हापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेचे माजी चेअरमन शिवाजी पाटील, प्राथमिक शिक्षक संघ थोरात गटाचे तालुका अध्यक्ष सदानंद पाटील, शिक्षक समितीचे चंदगड तालुका अध्यक्ष राजाराम जोशी, कोल्हापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेचे संचालक बाबू परीट, कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे तालुकाध्यक्ष विजय कांबळे, प्राथमिक मुख्याध्यापक संघटनेचे तालुकाध्यक्ष नामदेव चौगुले, चंदगड नगरपंचायतचे विरोधी गटनेते नवीद अत्तार, सुधीर पिळणकर, खेडूत शिक्षण संस्थेचे सचिव एम. एम. तुपारे, एस. व्ही. गुरबे, गोविंद पाटील, संजय साबळे सुभाष बेळगावकर, पी. आर. पाटील, प्रा. एन. एस. पाटील आदी विविध पदाधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment