मराठीचा दीपस्तंभ गोपाळ गावडे यांना ‘चंदगड तालुका मराठी प्रेरणा पुरस्कार’ जाहीर - चंदगड लाईव्ह न्युज

26 February 2026

मराठीचा दीपस्तंभ गोपाळ गावडे यांना ‘चंदगड तालुका मराठी प्रेरणा पुरस्कार’ जाहीर

गोपाळ गावडे

संपत पाटील / चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

    मराठी राजभाषा दिनानिमित्त चंदगड तालुक्यातील शिक्षण क्षेत्रातील प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व गोपाळ विठ्ठल गावडे यांना ‘चंदगड तालुका मराठी प्रेरणा पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे. मराठी विषयात एम. ए. बी. एड् शिक्षण घेतलेल्या गावडे यांनी तब्बल २४ वर्षे मुख्याध्यापक म्हणून उल्लेखनीय सेवा बजावत शिक्षण क्षेत्रात आदर्श कार्य उभारले आहे.

    भाई दाजीबा देसाई विद्यालय, पार्ले येथे (२०००-२०१३ व २०२४ पासून आजतागायत) तसेच स्वामी विवेकानंद विद्यालय, गुडेवाडी येथे (२०१३-२०२४) त्यांनी शिस्तबद्ध प्रशासन, गुणवत्तापूर्ण शिक्षण व संस्कारप्रधान उपक्रम राबवले.

    त्यांच्या नेतृत्वाखाली स्वामी विवेकानंद विद्यालयास दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ, बेळगाव यांच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात “आदर्श शाळा पुरस्कार” मिळाला, तर २०२४ मध्ये भाई दाजीबा देसाई विद्यालयास “स्वच्छ व सुंदर शाळा पुरस्कार” प्राप्त झाला.

    कोल्हापूर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघाचे स्वीकृत सदस्य आणि चंदगड तालुका मुख्याध्यापक संघाचे सक्रिय सदस्य म्हणून त्यांनी शैक्षणिक व सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.

    मराठी भाषेप्रती निष्ठा, विद्यार्थ्यांप्रती तळमळ आणि नेतृत्वगुणांच्या जोरावर गावडे सरांनी शिक्षण क्षेत्रात आदर्श निर्माण केला आहे. त्यांना मिळालेला “मराठी प्रेरणा पुरस्कार” हा संपूर्ण चंदगड तालुक्याच्या शैक्षणिक अभिमानाचा गौरव मानला जात आहे.

No comments:

Post a Comment