चिंचणे ग्रामपंचायत कार्यालय चोरट्यांनी फोडले, तिजोरीसह कपाटांची तोडफोड; ऐवज न मिळाल्याने चोरटे रिकाम्या हाताने पसार - चंदगड लाईव्ह न्युज

22 October 2026

चिंचणे ग्रामपंचायत कार्यालय चोरट्यांनी फोडले, तिजोरीसह कपाटांची तोडफोड; ऐवज न मिळाल्याने चोरटे रिकाम्या हाताने पसार

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

      चिंचणे (ता. चंदगड) येथील ग्रामपंचायत कार्यालय चोरट्यांनी फोडल्याची घटना उघडकीस आली आहे. कार्यालयातील लोखंडी तिजोरी फोडून तसेच अन्य कपाटांची तोडफोड करून चोरट्यांनी मौल्यवान वस्तू शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र, हाती कोणताही किमती ऐवज न लागल्याने चोरटे रिकाम्या हाताने पसार झाले.

    चिंचणे ग्रामपंचायत कार्यालय चिंचणे ते कामेवाडी या मुख्य रस्त्यालगत आहे. या कार्यालयात प्रामुख्याने शासकीय कागदपत्रे व इतर आवश्यक साहित्य ठेवण्यात येते. ग्रामपंचायत लहान असल्याने कार्यालयात रोख रक्कम किंवा अन्य मौल्यवान वस्तू ठेवलेल्या नव्हत्या. त्यामुळे चोरट्यांच्या हाती काहीही लागले नसल्याचे समजते.

    चोरट्यांनी कार्यालयातील लोखंडी तिजोरी फोडून त्यामध्ये काही मौल्यवान वस्तू आहेत का, याची चाचपणी केली. तसेच कार्यालयातील अन्य कपाटांचीही तोडफोड केली. परिसरात सातत्याने चोरीच्या घटना घडत असल्याने त्यातूनच हा प्रकार घडला असावा, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे. या प्रकरणाचा अधिक तपास कोवाड पोलीस करीत आहेत.

No comments:

Post a Comment