चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
आजच्या डिजिटल युगात मोबाईल हा जीवनाचा अविभाज्य भाग बनला असला, तरी त्याचा अतिवापर विद्यार्थ्यांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर, अभ्यासावर आणि सामाजिक जीवनावर विपरीत परिणाम करू शकतो. त्यामुळे मोबाईलचा वापर मर्यादित, योग्य आणि जबाबदारीने करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. योगेश पोवार यांनी केले.
शालेय आरोग्य तपासणी उपक्रमांतर्गत बागिलगे रामपूर विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, रामपूर (ता. चंदगड) येथे किशोरवयीन विद्यार्थ्यांसाठी आयोजित मार्गदर्शन कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका व्ही. जे. कालकुंद्रीकर होत्या.
डॉ. पोवार यांनी मोबाईलच्या अतिवापरामुळे होणारे दुष्परिणाम, अभ्यासाचा वेळ वाया जाणे, झोपेच्या वेळापत्रकात होणारे बदल, डोळ्यांवर येणारा ताण आणि एकाग्रतेवर होणारे परिणाम यांविषयी विद्यार्थ्यांना सोप्या भाषेत मार्गदर्शन केले. मोबाईल वापरण्यासाठी निश्चित वेळ ठरवणे, अभ्यासाच्या वेळी मोबाईल दूर ठेवणे, झोपण्यापूर्वी स्क्रीनचा वापर टाळणे आणि मैदानी खेळ, वाचन व प्रत्यक्ष संवादासाठी वेळ देणे, अशा सवयी अंगीकारण्याचे आवाहन त्यांनी केले.
इन्स्टाग्राम, यूट्यूब आणि इतर सोशल मीडिया ॲप्सचा वापर करताना विद्यार्थ्यांनी विशेष काळजी घेण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. सोशल मीडियावरील प्रत्येक माहिती खरी असेलच असे नाही. त्यामुळे अनोळखी व्यक्तींशी संवाद साधणे, वैयक्तिक माहिती व छायाचित्रे शेअर करणे, संशयास्पद लिंकवर क्लिक करणे तसेच सतत रील्स व व्हिडिओ पाहण्यात वेळ घालवणे टाळावे, असा सल्ला त्यांनी दिला. ऑनलाइन छळ किंवा गैरप्रकार आढळल्यास पालक व शिक्षकांना विश्वासाने सांगण्याचेही आवाहन केले.
यावेळी चंदगड पंचायत समितीचे सभापती प्रा. विलास नाईक यांनी विद्यार्थ्यांना आरोग्याचे महत्त्व विशद केले. उत्तम आरोग्य ही यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली असून, शारीरिक आणि मानसिक विकासासाठी नियमित व्यायाम व मैदानी खेळ आवश्यक आहेत, असे त्यांनी सांगितले. मोबाईलच्या आभासी जगात रमण्यापेक्षा मैदानावर खेळून शारीरिक क्षमता वाढवावी, सांघिक भावना जोपासावी आणि आरोग्यदायी जीवनशैली स्वीकारावी, असे आवाहनही त्यांनी विद्यार्थ्यांना केले.
मोबाईलचा वापर शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी, नवीन कौशल्ये शिकण्यासाठी आणि ज्ञान वाढवण्यासाठी प्रभावीपणे करता येतो. मात्र, तंत्रज्ञानाचा वापर आपल्या नियंत्रणात असावा; आपण तंत्रज्ञानाच्या आहारी जाता कामा नये, हा महत्त्वपूर्ण संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला. किशोरवयीन विद्यार्थ्यांमध्ये आरोग्यविषयक जागरूकता निर्माण करणे, सुरक्षित मोबाईल वापराच्या सवयी रुजविणे आणि खेळाचे महत्त्व पटवून देणे या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला.
कार्यक्रमाच्या व्यासपीठावर डॉ. स्नेहल पाटील, ए. बी. नाईकवाडी, सौ. व्ही. डी. पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एम. एन. शिवणगेकर यांनी केले, तर राजेंद्र शिवणगेकर यांनी आभार मानले.

No comments:
Post a Comment