![]() |
| अजिंक्य किल्ले पारगड वरील गडाचे पहिले किल्लेदार रायबा तानाजीराव मालुसरे यांच्या जगातील पहिल्या स्मारकाच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त उपस्थित मान्यवर. |
चंदगड : सी एल वृत्तसेवा
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या चंदगड तालुक्यातील ऐतिहासिक अजिंक्य किल्ले पारगडवर गडाचे पहिले किल्लेदार सुभेदार तानाजी मालुसरे यांचे पुत्र सुभेदार रायबा उर्फ रायाजी तानाजीराव मालुसरे यांच्या स्मारकाचा द्वितीय वर्धापन दिन बुधवार दि. २५ फेब्रुवारी २०२६ रोजी उत्साहात संपन्न झाला.
तानाजी मालुसरे यांचे चौदावे वंशज श्रेयश सुनील मालुसरे व डिजिटल मीडिया परिषद जिल्हा कार्यकारिणी सदस्य, पत्रकार, माजी मुख्याध्यापक श्रीकांत पाटील यांच्या हस्ते रायबा मालुसरे यांच्या पुतळ्यास अभिषेक करण्यात आला. सकाळी सह्याद्री प्रतिष्ठान कोल्हापूरचे दुर्ग सेवक निवृत्ती कुट्रे, गोविंद मासरणकर, संतोष मालुसरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी पालघर जिल्हा शिवशंभू दुर्ग प्रतिष्ठानचे दुर्ग सेवक प्रसाद सावे, युवराज मगदूम, संतोष चौगुले, सुभाष मोहिते, सी डी पाटील यांच्यासह माजी कालकुंद्री येथील माजी सैनिक शंकर कोले, गणेश पुजारी उपस्थित होते.
दुपारी किल्ले पारगड वरील जेष्ठ नागरिक राघोबादादा शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाचे स्वागत सुनील मालुसरे यांनी केले. यावेळी पत्रकार श्रीकांत पाटील, किल्ले पारगड येथील गिरिदुर्ग हॉटेलचे मालक विठ्ठल शिंदे, ग्रुप ग्रामपंचायत सरपंच तुकाराम सुतार (मिरवेल), संभाजी जांभळे आदींनी मनोगते व्यक्त केली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी, सुभेदार तानाजी मालुसरे की जय, सुभेदार रायबा मालुसरे की जय, तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवराय अशा घोषणांनी गड दुमदुमून गेला. कार्यक्रमासाठी आलेल्या मान्यवरांना सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने सुभेदार रायबा मालुसरे यांची प्रतिमा देऊन सन्मानित करण्यात आले. विलास मालुसरे यांनी आभार मानले.
यावेळी गडावरील जेष्ठ नागरिक धोंडीबा बेर्डे, प्रकाश चिरमुरे, अर्जुन तांबे, शांताराम बेर्डे आदींसह आप्पाजी मालुसरे, वैशाली मालुसरे, माली मालुसरे, विमल बेर्डे, शकुंतला मालुसरे, मंगल मालुसरे आदी कुटुंबीय व गडावरील सर्व नागरिक उपस्थित होते.
कार्यक्रमासाठी आलेल्या शेकडो शिवभक्त, दुर्गप्रेमी व नागरिकांना सालाबाद प्रमाणे यंदाही कालकुंद्री (ता. चंदगड) येथील श्री सरस्वती विद्यालय दहावी बॅच १९८१ वर्ग मित्रांच्या वतीने स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते. वर्ग मित्रांच्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वर्गमित्र ग्रुपच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.



No comments:
Post a Comment