कालकुंद्री येथील 'श्री कल्मेश्वर अखंड नाम सप्ताह, तसेच कुदनूर व राजगोळी बुद्रुक, नागरदळे, मलतवाडी येथील हरिनाम सप्ताहाची उद्या सांगता व महाप्रसाद - चंदगड लाईव्ह न्युज

27 February 2026

कालकुंद्री येथील 'श्री कल्मेश्वर अखंड नाम सप्ताह, तसेच कुदनूर व राजगोळी बुद्रुक, नागरदळे, मलतवाडी येथील हरिनाम सप्ताहाची उद्या सांगता व महाप्रसाद

 

श्री कल्मेश्वर ग्रामदैवत कालकुंद्री

कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा 

  कालकुंद्री (ता. चंदगड) येथील ग्रामदैवत श्री कल्मेश्वर चा 'अखंड नाम सप्ताह' शनिवार दि. २१ फेब्रुवारी २०२६ रोजी सुरू झाला होता. या सप्ताहाची समाप्ती उद्या शनिवार २८ फेब्रुवारी रोजी महाप्रसादाने होणार आहे. 

   "सांब सदाशिव सांब, हर हर सांब सदाशिव सांब" च्या अखंड जयघोषात सलग सात दिवस चालणारा हा महाराष्ट्र व उत्तर कर्नाटकातील वैशिष्ट्यपूर्ण एकमेव सप्ताह समजला जातो. दरवर्षी फाल्गुन शुद्ध पंचमीचा सूर्योदय ते फाल्गुन शुद्ध द्वादशी चा सूर्योदय पर्यंत सप्ताह चालू असतो. या सप्ताहाला यंदा ९७ वर्षे पूर्ण झाली असून शतक महोत्सवाकडे वाटचाल सुरू आहे. 

  सप्ताह काळातील सात दिवस भजन, कीर्तन, प्रवचन, रात्री नऊ ते बारा कीर्तन, हरिपाठ कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सप्ताह काळातील वैशिष्ट्यपूर्ण असा नवसाच्या मुलांच्या तुले चा कार्यक्रम शुक्रवारी पार पडला. 

उद्या २८ रोजी सकाळी सूर्योदयला सप्ताह सांगता झाल्यानंतर सकाळी ९ वाजेपर्यंतश्री कलमेश्वर देवाच्या पालखीची गाव प्रदक्षिणा. १० ते सायंकाळी ५ पर्यंत महाप्रसाद तर रात्री नवक्रांती लोककला मंडळ लकीकट्टे यांचा सोंगी भजन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. अखंड नाम सप्ताह कमिटीच्या वतीने भाविकांनी श्रींचे दर्शन व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान गाव व परिसरात बाल चमुंच्या मनोरंजनासाठी खेळण्याच्या दुकानांची गर्दी झाली आहे. यावेळी गावात विविध मंडळांच्या वतीने गाव मर्यादित, मर्यादित षटकांच्या क्रिकेट स्पर्धा तसेच प्रो कबड्डी लीग स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.

   याशिवाय कर्यात भागातील कुदनूर, राजगोळी बुद्रुक, नागरदळे, मलतवाडी येथील हरिनाम सप्ताह सांगता व महाप्रसाद उद्या दिनांक 28 रोजीच होत असल्याने कर्यात भागात भक्तिमय वातावरण पसरले आहे.

No comments:

Post a Comment