कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा
महाराष्ट्र राज्य पेन्शनर्स असोसिएशन पुणे अंतर्गत कोल्हापूर जिल्हा सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक संघटनेचे त्रैवार्षिक अधिवेशन शाहू लॉन मंगल कार्यालय कूर (ता. भुदरगड, जि. कोल्हापूर) येथे संपन्न होणार आहे. पेन्शनर असोसिएशन पुणे विभागाचे अध्यक्ष एन. डी. मारणे यांच्या अध्यक्षतेखाली रविवार दि. १ मार्च २०२६ रोजी सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळेत होणाऱ्या अधिवेशन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री ना. हसन मुश्रीफ, कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस, प्राथमिक शिक्षणाधिकारी मीना शेंडकर, जि.प.चे मुख्य लेखा व वित्त अधिकारी अतुल आकुर्डे, रत्नागिरी जि.प. माध्यमिक शिक्षणाधिकारी दीपक मेंगाणे, उपशिक्षणाधिकारी आर. व्ही. कांबळे, भुदरगडचे गटविकास अधिकारी डॉ. शेखर जाधव, गटशिक्षणाधिकारी प्रबोध कांबळे उपस्थित राहणार आहेत.
या अधिवेशनाच्या निमित्ताने सेवानिवृत्त शिक्षकांच्या प्रलंबित विविध मागण्या मांडण्यात येणार आहेत. यात निवृत्तीवेतन, अंशराशीकरण पुनर्स्थापना कालावधी १५ ऐवजी १२ वर्षे करावा. ६५, ७०, ७५, ८० वर्षे वयानंतर अनुक्रमे ५, १०, १५ व २० टक्के अतिरिक्त निवृत्ती वेतनवाढ मंजूर करावी. निवृत्तीवेतन दरमहा पाच तारीखेपूर्वी देण्यात यावे. उपदान, अंशराशीकरण व इतर थकीत रकमा त्वरित मिळाव्यात. मृत्यू आणि सेवा उपदानाची मर्यादा शासनाने २० लाख रुपये केली आहे त्याचा लाभ प्राथमिक शिक्षकांनाही मिळावा. केंद्र शासनाप्रमाणे दरमहा १००० रुपये वैद्यकीय भत्ता मिळावा. एमएससीआयटी (संगणक) वसुली कायदा कायमस्वरूपी बंद करून वसूल झालेली रक्कम परत मिळावी. सर्वच प्राथमिक शिक्षकांना विनाअट जुनी पेन्शन योजना लागू करावी. पेन्शन धारकांच्या पश्चात कुटुंबातील वारसांना कुटुंब निवृत्ती वेतन ६० ऐवजी १००% करावे. आदी २१ मागण्या या अधिवेशनात मांडण्यात येणार आहेत.
या अधिवेशनाच्या निमित्ताने राज्यस्तरावरील तसेच कोल्हापूर जिल्हा व सर्व तालुक्यातील सेवानिवृत्त शिक्षक संघटनांचे नेते उपस्थित राहणार आहेत. तरी जिल्ह्यातील सर्व सेवानिवृत्त शिक्षक व कुटुंब निवृत्ती वेतन धारकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. असे आवाहन संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजी हवालदार, उपाध्यक्ष वसंत जोशीलकर, विठ्ठल बर्गे, काकासाहेब पाटील, के. डी. पाटील, सचिव शामराव काशीद आदींनी केले आहे.

No comments:
Post a Comment