संपत पाटील - चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
"स्पर्धा परीक्षा ही केवळ घोकंपट्टी नसून ते एक व्यवस्थापनाचे शास्त्र आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी न्यूनगंड बाळगण्याऐवजी योग्य दिशा आणि तंत्राचा वापर केल्यास प्रशासकीय सेवेची शिखरे काबीज करणे सहज शक्य आहे," असे प्रतिपादन गडहिंग्लज येथील झेप स्पर्धा परीक्षा अकॅडमीचे संचालक विवेक दड्डी यांनी केले.
चंदगड येथील र.भा माडखोलकर महाविद्यालयाच्या स्पर्धा परीक्षा विभागाच्या वतीने आयोजित 'स्पर्धा परीक्षेचे तंत्र' या विषयावरील कार्यशाळेत ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्रभारी प्राचार्य डॉ. एस. डी. गोरल, अजिंक्य कोकितकर, समन्वयक डॉ. टी. ए. कांबळे उपस्थित होते.
आपल्या ओघवत्या शैलीत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना विवेक दड्डी यांनी स्पर्धा परीक्षेच्या तयारीचे बारकावे उलगडून दाखवले. ते म्हणाले की, "परीक्षेचा अभ्यासक्रम हा समुद्रासारखा अथांग वाटत असला, तरी मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण केल्यास नेमका मार्ग सापडतो. विद्यार्थ्यांनी वर्तमानपत्रांचे वाचन, चालू घडामोडींवरील पकड आणि वेळेचे अचूक नियोजन या त्रिसूत्रीचा अवलंब करावा. यशासाठी केवळ 'हार्ड वर्क' करून चालत नाही, तर प्रश्नांचे स्वरूप ओळखून केलेले 'स्मार्ट वर्क' तुम्हाला इतरांपेक्षा पुढे नेईल."
यावेळी त्यांनी झेप अकॅडमीच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांनी यश कसे संपादन केले, याची उदाहरणे देऊन उपस्थित विद्यार्थ्यांमध्ये चैतन्य निर्माण केले. याप्रसंगी अजिंक्य कोकितकर यांनीही स्पर्धा परीक्षेतील मुलाखत तंत्रावर मोलाचे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रभारी प्राचार्य डॉ. एस. डी. गोरल यांनी आपल्या भाषणात महाविद्यालयाच्या स्पर्धा परीक्षा विभागाच्या उपक्रमांचे कौतुक केले. ते म्हणाले, "विद्यार्थ्यांनी पदवी शिक्षणासोबतच स्पर्धा परीक्षेचा पाया रचला पाहिजे. विवेक दड्डी यांच्यासारख्या तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाचा लाभ घेऊन चंदगड तालुक्यातील तरुणांनी अधिकाधिक संख्येने अधिकारी बनावे."
कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्पर्धा परीक्षा विभाग समन्वयक डॉ. टी. ए. कांबळे यांनी केले. त्यांनी विभागाच्या कामकाजाचा आढावा मांडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ. आर. के. तेलगोटे यांनी मानले. या कार्यशाळेला महाविद्यालयातील बहुतांश विद्यार्थी व प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:
Post a Comment