चंदगड : सी. एल. वृत्तसेवा
चंदगडचे हरितक्रांतीचे, चंदगड आजरा तालुक्यात धरणे बांधून लाखो एकर शेतजमीन ओलिताखाली आणणारे माजी मंत्री भरमूआप्णा यांच्या कुटुंबाने माझ्या आमदारकीसाठी खूप मोठी दानत दाखवली आहे. हे ऋण मी कधीही विसरणार नाही. या पुढची चंदगडची आमदारकी भरमू आण्णा यांच्या घरात राहील. त्यांनी जो उमेदवार ठरवतील ते आमदार होतील. मुलगा दीपक पाटील यांचा विचार करावा किंवा सून ज्योतीताई पाटील यांचा विचार करावा ते भरमूअण्णांनी ठरवावे असे सांगून त्यांच्या वाढदिवसानिमित्त दीर्घायुष्य लाभो असा शुभेच्छा संदेश चंदगडचे आमदार शिवाजीराव पाटील यांनी दिला.
![]() |
| मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या फोनवरून शुभेच्छा स्वीकारताना |
पाटणे फाटा (कार्वे) येथील स्वराज्य मल्टीपर्पज हॉलमध्ये माजी मंत्री भरमूआण्णा पाटील यांचा नव्वादावा वाढदिवस विविध मान्यवर व हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत झाला.
व्यासपीठावर अंबरीश घाटगे, बेळगावचे माजी आमदार परशुराम नंदीहळी, प्रा. किसनराव कुराडे, ज्योतीताई पाटील, गोकुळचे माजी संचालक दीपक पाटील, शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे नेते प्रभाकर खांडेकर, माणगाव येथील पतसंस्थेचे चेअरमन एस. आर. पाटील, चंदगड तालुका संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष लक्ष्मण गावडे, चंदगड पंचायत समितीचे माजी सभापती यशवंत सोनार, ज्येष्ठ पत्रकार उदयकुमार देशपांडे, बांधकाम व्यवसायिक जी. एम. पाटील, शामराव बेनके, चंदगड नगराध्यक्ष सुनील काणेकर, चंदगड तालुका पंचायत समितीचे माजी सभापती शांताराम पाटील, भाजप तालुकाध्यक्ष दिग्विजय देसाई, कॅश्यु इंडस्ट्रीज असोसिएशनचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष मोहन परब, माजी जिल्हा परिषद सदस्य सचिन बल्लाळ, रवी बांदिवडेकर, गडहिंग्लज कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन भावकु गुरव, भाजपचे माजी तालुका अध्यक्ष नामदेव पाटील होते.
मांडेदुर्गचे सरपंच विनायक कांबळे, उपसरपंच गणपती पवार, काँग्रेसचे नेते संभाजी देसाई - शिरोलीकर, गोपाळराव पाटील, एम. जे. पाटील, विष्णू गावडे, कलाप्पा नेवगिरे, कलाश्री उद्योग समूहाचे प्रकाश डोळेकर यांनीही शुभेच्छा दिल्या.
![]() |
| वाढदिवसाच्या कार्यक्रमा वेळी व्यासपीठावर उपस्थित मान्यवर |
भरमू पाटील म्हणाले, "मी उभ्या आयुष्यात समाजकारण म्हणूनच पाहिले आहे. सर्व सामान्य कार्यकर्ता हेच माझे भांडवल आहे. मी मंत्री झाल्यानंतर चंदगड आजरा तालुक्यात अनेक धरणे बांधण्यासाठी आग्रही राहिलो. यामुळे आज हजारो एकर जमिनीवर बारमाही पिके घेतली जातात. हे चित्र पाहून माझा उर भरून येतोय. आगामी काळातही गडहिंग्लज तालुक्याच्या पूर्व भागात धरणांचे पाणी पोहोचावे यासाठी पाठपुरावा करत आहे.
आमदार शिवाजी पाटील म्हणाले, चंदगड मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या मदतीतून तीन कंपन्या चंदगड तालुक्यात आणण्यासाठी मी प्रयत्नशील आहे. या माध्यमातून हजारो तरुणांना रोजगार मिळणार आहे. कोवाड क्रीडा संकुलला जागा मिळण्यासाठी विरोधकांनी खोडा घातला. मात्र त्यांना त्यांची जागा येथे जिल्हा परिषद निवडणुकीत दाखवून देऊ.
कोवाड येथील नियोजित क्रीडा संकुल आता कळसगादे येथे होणार असून चंदगड मतदार संघाला भाजपचा बालेकिल्ला करणार आहे. यामुळे जनतेने आता शाश्वत विकासाला साथ देऊन पुढील वाटचाल केली पाहिजे.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आमदार शिवाजी पाटील यांच्या मोबाईलवर कॉल करून अण्णांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. सदर कॉल कार्यक्रमाच्या हॉलमध्ये लाऊड स्पीकरवरून उपस्थित कार्यकर्त्यांना ऐकवण्यात आला.





No comments:
Post a Comment