खड्डे व चिखलात हरवला कालकुंद्री - किटवाड रस्ता...! 'अच्छे दिन' ची ग्रामस्थांना प्रतीक्षा - चंदगड लाईव्ह न्युज

07 July 2024

खड्डे व चिखलात हरवला कालकुंद्री - किटवाड रस्ता...! 'अच्छे दिन' ची ग्रामस्थांना प्रतीक्षा

कालकुंद्री - किटवाड रस्त्याची चिखलामुळे झालेली दयनीय अवस्था

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा
       आधीच दगड - धोंडे, माती, खड्डे, दोन्ही बाजू कडील अतिक्रमणे व झाडाझुडुपांनी वेढल्यामुळे दुरावस्था झालेल्या कालकुंद्री ते किटवाड रस्त्यावर पावसाळ्याच्या पहिल्या दिवसापासूनच चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. किटवाड धरण व धबधबा पाहण्यासाठी येणारे पर्यटक व ग्रामस्थांना हे दिव्य पार करताना मरण यातना भोगाव्या लागत आहेत. 
   दुसरीकडे कालकुंद्री ते कोवाड रस्ता नदीवर पुलाचा अभाव व चिखलामुळे चार महिने बंदच असतो. तीस वर्षांपूर्वी माजी मंत्री भरमूआण्णा आमदार असताना जिल्हा मार्गाचा दर्जा मिळालेल्या कोवाड, कालकुंद्री ते किटवाड मार्गाची दुरवस्था जाऊन 'समृद्धी' कधी येणार? असा सवाल  परिसरातील ग्रामस्थ करत आहेत.
     कोवाड ते कालकुंद्री  व कालकुंद्री ते किटवाड असा एकूण ६ किलोमीटर लांबीचा रस्ता बारमाही वाहतुक योग्य करण्याची मागणी गेली अनेक दशके सुरू आहे. चंदगडच्या पूर्व भागातून बेळगाव ला जाण्यासाठी सर्वात जवळचा मार्ग म्हणून ब्रिटिश काळापासून या रस्त्याकडे पाहिले जाते. सुमारे ६ किमी लांबीचा  हा मार्ग मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान ग्राम सडक योजनेतून व्हावा यासाठी तिन्ही गावातील ग्रामस्थांची धडपड सुरू आहे. या रस्त्यात जमिनी जाणाऱ्या शेतकऱ्यांनी आपली जमीन विना मोबदला देण्यास तयार असल्याचे स्टॅम्प पेपरवर लेखी हमीपत्रे दोन वर्षांपूर्वी देऊनही शासनाकडून कोणत्याच हालचाली दिसत नाहीत. याबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे. 
  शिवसेना शासन काळात १९९६ मध्ये कृष्णा खोरे विकास योजनेतून किटवाड नजीक झालेल्या  क्र. १ च्या सांडव्यातून निर्माण झालेला धबधबा व निसर्गरम्य परिसरामुळे गेल्या काही वर्षात चंदगड, आजरा, गडहिंग्लज, बेळगाव, हुक्केरी तालुक्यातून येणाऱ्या पर्यटकांची संख्या कमालीची वाढली आहे. येथील धबधबा कालकुंद्री गावच्या हद्दीत असल्यामुळे इकडून जाणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी आहे. तथापि  रस्त्याची अवस्था पाहून लांबून आलेल्या पर्यटकांची कुचंबणा होत आहे. 
   या रस्त्याच्या पूर्ततेसाठी तिन्ही गावातील शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने  खा. धनंजय महाडिक, तत्कालीन खा. संजय मंडलिक व बांधकाम विभागांना प्रत्यक्ष भेटून निवेदन दिले होते. तथापि या मागणीला यश आल्याचे दिसत नाही. आत्ता नूतन खासदार शाहू छत्रपती महाराज यांच्याकडून ग्रामस्थांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.
  राजेश पाटील यांच्या फंडातून या रस्त्यापैकी एक किलोमीटरच्या टप्पा खडीकरण, डांबरीकरण साठी ४० लाख रुपये निधी मंजूर आहे. यातून कालकुंद्री गावानजीकचे १ किमी अंतर सोडून पुढील १ किमी रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण कामाचे भूमिपूजन मार्च महिन्यात झाले असले तरी काम अजून अपूर्ण आहे. तर १५ वर्षांपूर्वी एकदा खडीकरण व डांबरीकरण झालेला गावालगतचा टप्पा पुन्हा खड्डे व चिखलाच्या विळख्यात सापडला आहे. दरम्यान शासकीय स्तरावरून कोवाड- किटवाड या ५ किमी लांब व ३६ फूट रुंद रस्ता सर्वेक्षणाच्या हालचाली सुरू झाल्याचे समजते.

No comments:

Post a Comment