![]() |
| संग्रहित छायाचित्र |
संपत पाटील - चंदगड / सी एल वृत्तसेवा दि. २२-०१-२०२६
चंदगड शहरांमधील शिक्षक कॉलनी येथे आज रात्री पावणे अकराच्या दरम्यान बिबट्याचे दर्शन झाले. शिक्षक कॉलनी येथे राहत असलेले शिक्षक दीपक गावडे हे आपल्या घरातून चूळ भरण्यासाठी बाहेर आले असता ब्रह्मा कुमारी मंदिराच्या परिसरात त्यांना या बिबट्याचे दर्शन झाले. बिबट्या शिक्षक कॉलनीत आल्याने शिक्षक कॉलनीमध्ये राहत असलेल्या रहिवाशांच्या मध्ये सध्या भीतीचे वातावरण पसरले आहे. शिक्षक कॉलनीतील विक्रम मुतकेकर यांनी याबाबतची माहिती वन विभागाला देऊन शिक्षक कॉलनीच्या व्हाट्सअप ग्रुप वर मेसेज टाकून लोकांना सावधान केले. रात्रीच्या वेळी जेवण आटपल्यानंतर काही लोक कॉलनीतील रस्त्यावर फिरण्यासाठी बाहेर पडतात. आजी काही लोक असेच बाहेर पडले होते. ती माहिती कळतच सर्वांनी आपल्या घरीच राहणे पसंत केले.
दरम्यान या बिबट्याच्या पावलांचे ठसे चार दिवसापूर्वी ब्रह्मकुमारी मंदिर परिसरात दिसल्याचे ब्रह्मकुमारी मंदिरच्या सहकाऱ्यांनी सांगितल्याचे समजते. त्यामुळे हा बिबट्या शिक्षक कॉलनी परिसरात यापूर्वीही येऊन गेल्याचे दिसते. मात्र त्याचे दर्शन झाले नव्हते. आज मात्र या बिबट्याचे दर्शन झाल्याने या पाऊल पुन्हा बिबट्याच्याच असल्याचे स्पष्ट झाले.
गेल्या महिन्याभरापासून बिबट्या चंदगड तालुक्यातील काही ठिकाणी दर्शन देत असल्यामुळे रात्रीच्या वेळी बाहेर पडणे बऱ्याच नागरिकांनी टाळले आहे. काही दिवसांपूर्वी चंदगड पासून काही अंतरावर असलेल्या देसाईवाडी नजीक शेतावर रखवालीसाठी बांधलेले कुत्रे देखील बिबट्याने अर्धवट खाल्ले होते. त्यानंतर बिबट्याने वाळकुळी परिसरात व चार-पाच दिवसापूर्वी नागनवाडी परिसरात दिवसादेखील दर्शन दिल्याने लोकांच्यामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
हा बिबट्या याच परिसरात फिरत असल्याने वन विभागाने ठोस उपाययोजना करून या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

No comments:
Post a Comment