महेश ढेकोळकर यांचा प्रामाणिकपणा, तुर्केवाडी- माडवळे रस्त्यावर सापडलेल्या दागिन्यांची पिशवी केली परत - चंदगड लाईव्ह न्युज

22 June 2025

महेश ढेकोळकर यांचा प्रामाणिकपणा, तुर्केवाडी- माडवळे रस्त्यावर सापडलेल्या दागिन्यांची पिशवी केली परत

  


कुदनूर : सी एल वृत्तसेवा 

     वरगाव येथील विठ्ठल शंकर पाटील यांचे चिरंजीव विलास यांचा साखरपुडा माडवळे येथील पुंडलिक बाळू पवार यांची मुलगी पूजा यांच्याशी आज झाला होता. नवरी मुलगीचे साखरपुड्याचे कुडे-झुबे, अंगठी व पैंजण असे  80,000 रुपये किमतीचे दागिने घेऊन जात असताना वराकडील मंडळींच्या गाडीवरून दागिन्यांची पिशवी तुर्केवाडी ओढ्याजवळ डम्पिंग ग्राउंड शेजारी रस्त्यावर पडली होती. साखरपुड्याचे नवरी मुलगीचे दागिने जाताना हरवल्याने वराकडील मंडळी चिंतेत पडली होती. 

    त्यानंतर माडवळेहून दागिने हरवल्याचा मेसेज सगळीकडे सोडण्यात आला होता. तुर्केवाडी ते माडवळे याच दरम्यान पिशवी पडली असल्यामुळे तुर्केवाडी आणि माडवळे परिसरातील व्हाट्सअप ग्रुपवर दागिने हरवल्याचा संदेश सोडण्यात आला होता. तुर्केवाडीच्या एका व्हाट्सअप ग्रुपवर हा संदेश आल्यानंतर तुर्केवाडी येथील कुमार महेश संजय ढेकोळकर आणि संतोष ढेकोळकर यांनी दिलेल्या नंबरवर संपर्क साधून दागिने सदृश्य सापडलेली पिशवी आपल्याकडे असुन ओळख पटवून घेऊन जाण्यास सांगितले.      

    तात्काळ ही बातमी माडवळे पर्यंत पोहोचली. वधू आणि वराकडील मंडळीनी महेश ढेकोळकर व संतोष ढेकोळकर यांच्या घरी प्रत्यक्ष भेट देऊन आपल्या संपूर्ण दागिन्यांची ओळख सांगितली. खात्री झाल्यानंतर महेश आणि संतोष ढेकोळकर यांनी विनासंकोच हे सर्व दागिने त्यांच्या कुटुंबीयांकडे सोपवले. कुमार महेश ढेकोळकर हे काही कामानिमित्त तुर्केवाडी फाट्यावर जात असताना तुर्केवाडी ओढ्याजवळ पिशवी सदृश्य गोष्ट त्यांला दिसली होती. ती उचलून घेतली असता त्यामध्ये दागिने सापडले. श्री महेश ढेकोळकर व संतोष ढेकोळकर यांच्या प्रामाणिकपणाचे वधू-वर पक्षांकडील मंडळींनी कौतुक केले. ढेकोळकर यांच्या प्रामाणिकपणामुळे वधू-वर पक्षातील मंडळींचे चिंतेचे सावट दूर झाले. याप्रसंगी महेश व संतोष ढेकोळकर यांचे विशेष आभार मानण्यात आले.

  इतरांच्या गळ्यातील दागिने हिसकावून पळणाऱ्या व दुसऱ्यांची मालमत्ता हडपण्यासाठी टपून बसलेल्या चोरांच्या गर्दीत ढेकोळकरांचा प्रामाणिकपणा समाजाला एक वेगळी दिशा देणारा ठरत आहे.

No comments:

Post a Comment