.....अखेर भावाची बहिणीशी भेट झालीच नाही !!! बेदरकार डंपर ने घेतला शिवणगेच्या तरुणाचा बळी ! - चंदगड लाईव्ह न्युज

22 June 2025

.....अखेर भावाची बहिणीशी भेट झालीच नाही !!! बेदरकार डंपर ने घेतला शिवणगेच्या तरुणाचा बळी !

 

करतिा बोडकेट्टी : रस्त्यावर आढवा झालेला वाळुने भरलेला डंपर

कुदनूर : सी. एल.  वृत्तसेवा / सचिन तांदळे 

       बेळगाव येथील पाहुण्यांचा लग्न सोहळा आटोपून राजगोळी बुद्रुक (ता. चंदगड) येथे बहिणीच्या भेटीसाठी निघालेल्या भावाला नियतीने वाटेतच अर्ध्यावरच थांबवले. याचवेळी बेदरकारपणे समोरून येणाऱ्या महाकाय वाळूने भरलेल्या डंपरने दुचाकीला उडवले आणि या अपघातात भावाचा जीवच घेतला. या घटनेत संदीप गणपती मुंगारे (रा. शिवणगे, वय ३६ ) या तरुणाचा शनिवारी (दि. २१) मृत्यू झाला. राजगोळी बुद्रुक पासून अपघातस्थळ केवळ पाच किलोमीटर अंतरावर इतक्यातच काळाने संदीप वर घाला घातला.

संदीप गणपती मुंगारे

    याबाबत पोलिसांतून मिळालेली अधिक माहिती अशी की, संदीप हा शिवणगे येथून बेळगाव - वेंगुर्ला राज्य मार्गाने बेळगाव येथे पाहुण्यांच्या लग्नासाठी गेला होता. यानंतर लग्नसोहळा उरकून तो राजगोळी बुद्रुक (ता. चंदगड) येथील मावस बहिणीला भेटण्यासाठी निघाला. यावेळी तो बेळगाव बोडकेनट्टी मार्गे राजगोळी बुद्रुकला जाऊन कोवाड मार्गे शिवणगे येथे आपल्या मूळ गावी जाण्याचे नियोजन केले होते. मात्र तो बोडकेनट्टी व कुरिहाळ (ता. बेळगाव) या दरम्यान ओढ्या जवळ त्याला राजगोळीच्या दिशेने बेळगावला जाणाऱ्या वाळूने भरलेल्या बेदरकार डंपरने उडवले. यावेळी संदीप हा सुमारे 20 फूट दूरवर उडून पडला होता. त्याच्या डोक्याला जबरदस्त मार लागला. सदर घटना शुक्रवारी (दि. 20) दुपारी 3.30 वाजता घडली. यानंतर त्याला बेळगाव येथील खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले. उपचाराला प्रतिसाद न मिळाल्याने त्याचा शनिवारी (दि. 21) सकाळी मृत्यू झाला.


संदीप हा एकुलता एक

    संदीप हा एकुलता एक असल्याने संपूर्ण कुटुंबाची त्याच्यावर जबाबदारी होती. त्याच्या पश्चात आता केवळ आई आहे. तो कुटुंबाचा आधारवडच गेल्याने संपूर्ण शिवणगे गावावर शोककळा पसरली आहे. सदर डंपर चालक हा बेदरकारपणे चालवत होता. या अपघाताच्या आधी काही मिनिटे तो कालकुंद्री ते बेळगाव या बसला खेटून ओव्हरटेक करून पुढे गेला होता. त्यामुळे सुदैवाने अन्य काही ठिकाणचे अपघात टळले. डंपर चालक इतका बेदरकार होता की, तो रस्त्यावर आडवा झाला होता. या घटनेची नोंद बेळगाव येथील काकती पोलीस ठाण्यात झाली असून  अधिक तपास सुरू आहे. 


दोन महिन्याआधीही  नवविवाहित तरुण ठार

        या मार्गावरील बेदरकारपणे वाळू वाहतूक करणारे डंपर चालक प्रवाशांचे बळी घेत आहेत. महिनाभर आधी अलतगा क्रॉस या ठिकाणीही वधू वर दुचाकीवरून जात असताना, त्या दुचाकीला डंपर ने उडवले. यात महिनाभर आधी लग्न झालेल्या नववराचा मृत्यू झाला. या घटनेमध्ये नववधूच्या हाताला मोठी दुखापत झाली. त्यामुळे बेदरकार डंपरचालकांचा प्रश्न आता गंभीर होत आहे.

कोवाड आणि बेळगाव पोलिसांनी कडक तपासणी करावी 

    राजगोळी खुर्द तसेच अन्य ठिकाणावरून वाळू भरून घेऊन जाणाऱ्या  मद्यपी चालकांची तपासणी करून  चालकावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी चंदगड तालुक्यातून होत आहे. चंदगड तालुक्याला लागून असणारे व बेळगावला जाणाऱ्या रस्त्यावर चंदगडचे प्रवासी अधिक आहेत. त्यामुळे कोवाड पोलिसांनी लक्ष घालून अशा चुकीच्या प्रकारावर आळा घालण्यासाठी ठोस भूमिका घेणे गरजेचे आहे. अशी मागणी आता कोवाड परिसरातून पुढे येत आहे.

No comments:

Post a Comment