कोवाड मर्चंट पतसंस्थेच्या रौप्य महोत्सवी कार्यक्रमात बोलताना प्राचार्य आनंद मेणसे सोबत मान्यवर.
कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा
'समाजात बडेजाव दाखवण्यासाठी, यात्रा जत्रांमध्ये वारेमाप खर्च केला जातो. मराठा बहुजन समाजाने अशाप्रकारे पैसा उडवण्यासाठी पतसंस्था व सावकारी कर्ज काढून कर्जबाजारी होऊ नये. लक्ष्मी यात्रा करून आजपर्यंत कोणाच्या घरात लक्ष्मी आलेली नाही. कर्जे घेऊन यात्रा, जत्रा मध्ये मौज-मजा करणारी अनेक कुटुंबे देशोधडीला लागली आहेत. दुसरीकडे यात्रा जत्रांसाठी कर्जे देणाऱ्या अनेक पतसंस्था कर्जाची परतफेड न झाल्याने बुडाल्याची उदाहरणे आहेत. असे परखड प्रतिपादन जी एस एस कॉलेज बेळगावचे माजी प्राचार्य कॉम्रेड आनंद मेणसे यांनी केले. ते कोवाड, ता. चंदगड येथील 'दि कोवाड मर्चंट ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित कोवाड' या संस्थेच्या रौप्य महोत्सवानिमित्त कोवाड येथील श्री मंगल कार्यालय येथे बुधवार दि. ३ सप्टेंबर २०२५ रोजी आयोजित कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. विभागीय सहनिबंधक डॉ. महेश कदम हे अध्यक्षस्थानी होते.
![]() |
कोवाड मर्चंट पतसंस्था रौप्य महोत्सवी कार्यक्रमात बोलताना विभागीय सहनिबंधक महेश कदम |
कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून झाली. यावेळी श्रीराम विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी ईशस्तवन व स्वागत गीत सादर केले. कार्यक्रमाचे स्वागत ज्येष्ठ संचालक बी. के. पाटील यांनी केले. प्रास्ताविक व्हा. चेअरमन उत्तम मुळीक यांनी केले. यावेळी बोलताना चेअरमन दयानंद मोटुरे यांनी संस्थेच्या २५ वर्षातील कार्याचा आढावा घेतला. ५० हजार रुपये भाग भांडवल वर सुरू झालेली पतसंस्था संचालक व कर्मचाऱ्यांची मेहनत व सभासदांचा विश्वास यामुळे २५ वर्षात उत्तरोत्तर प्रगतीपथावर असून ठेवींची रक्कम १० कोटींच्या वर गेली आहे. तालुक्यातील तालुक्याच्या पश्चिम भागातील सभासद व नागरिकांची मागणी लक्षात घेता लवकरच दुसरी शाखा पाटणे फाटा परिसरात काढण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले.
![]() |
कोवाड मर्चंट पतसंस्थेच्या रौप्य महोत्सवी कार्यक्रमास उपस्थित मान्यवर व सभासद |
अध्यक्षीय भाषणात महेश कदम यांनी ग्रामीण भागात पतसंस्था चालवणे कठीण असले तरी सावकारी जाचातून मुक्त होण्यासाठी पतसंस्थांचे महत्त्व मोठे आहे. गुंतवणूक दारांनी ब्राह्मक अफवा, भ्रामक व आक्रमक जाहिरातींना भुलून आर्थिक संकटात जाऊ नये. पतसंस्थांनी कर्जदारांना तात्काळ कर्ज पुरवठा करून वसुलीचे योग्य नियोजन करावे. कर्जदार मोठा होतो तेव्हाच पतसंस्था ही मोठी होत असते. संस्था मोठी करण्यासाठी संचालकांनी सभासद संख्या वाढवण्यावर अधिक भर द्यावा अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली. प्रमाणित लेखा परीक्षक सुरेश पवार म्हणाले सभासदांना शेती, उद्योग, व्यवसाय, शिक्षण यासाठी तात्काळ कर्ज पुरवठा करा, पण सभासदांकडून नियोजनबद्ध कर्जफेड व्हावी म्हणून कर्जदारांसाठी मार्गदर्शन वर्गांचे आयोजन पतसंस्थांनी करावे असे आवाहन केले. यावेळी जिल्हा उपनिबंधक निळकंठ करे, महाराष्ट्र केसरी पैलवान विष्णू जोशीलकर, एम. जे. पाटील, आदींची भाषणे झाली.
यावेळी सहाय्यक निबंधक सुजय येजरे, लेखापरीक्षक सुरेश घाटगे, एम. व्ही. पाटील, अशोकराव देसाई, विक्रम चव्हाण- पाटील, भावकू गुरव, श्रीधर भोगण, वाय. बी. पाटील, यशवंत सोनार, पाच्छासो काजी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी संस्थेचे विद्यमान व्यवस्थापक पुंडलिक प. पाटील यांचा सेवानिवृत्ती बद्दल मान्यवरांच्या हस्ते सपत्नीक गौरव करण्यात आला.
संस्थच्या प्रगतीत योगदान दिल्याबद्दल विद्यमान चेअरमन दयानंद मोटुरे, व्हाईस चेअरमन उत्तम मुळीक, संचालक महंमदशाकीर काजी, राणबा उर्फ बंडू तोगले, कल्लाप्पा रामजी वांद्रे, सौ गीतांजली कांतीलाल अंगडी, संतू मारुती उर्फ बाळू वांद्रे, वीरुपाक्ष गणाचारी, रवी मारुती पाटील, सौ मनीषा गोविंद पाटील, बी. के. पाटील, विष्णू गावडे, कृष्णा कांबळे, माजी चेअरमन मारुती पाटील, दुंडाप्पा अंगडी आदींचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सुभाष कोरी व प्रा. मोहन घोळसे यांनी केले. संचालक बंडू तोगले यांनी आभार मानले.
No comments:
Post a Comment