‘खेडूत चषक २०२५’ वक्तृत्व स्पर्धेत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग, “भाषणकला ही व्यक्तिमत्त्व घडवणारी अद्भुत कला” - एम. एम. तुपारे यांचे प्रतिपादन - चंदगड लाईव्ह न्युज

12 November 2025

‘खेडूत चषक २०२५’ वक्तृत्व स्पर्धेत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग, “भाषणकला ही व्यक्तिमत्त्व घडवणारी अद्भुत कला” - एम. एम. तुपारे यांचे प्रतिपादन

१०३ विद्यार्थ्यांनी समाज, शिक्षण, संस्कार व पर्यावरण विषयांवर मांडले प्रभावी विचार

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

        खेडूत शिक्षण मंडळ आयोजित ‘खेडूत चषक वक्तृत्व स्पर्धा २०२५’ ला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. महात्मा फुले विद्यालय, मजरे कारवे येथे झालेल्या या स्पर्धेचे उद्घाटन खेडूत शिक्षण मंडळाचे सचिव श्री. एम. एम. तुपारे यांच्या हस्ते झाले.

        उद्घाटन प्रसंगी बोलताना श्री. तुपारे म्हणाले, “भाषणकला ही केवळ वक्तृत्वाची नव्हे, तर व्यक्तिमत्त्व घडविण्याची आणि विचारांना धार लावण्याची अद्भुत कला आहे. एखाद्या व्यक्तीची ओळख तिच्या विचारांवर आणि त्या विचारांना मांडण्याच्या शैलीवर ठरते. योग्य विचार योग्य शब्दांत मांडले, तर ते समाजमन जिंकून इतिहास घडवू शकतात.”

        कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य एन. डी. देवळे होते. त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले की, “वक्तृत्वकलेमुळे विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, विचारशक्ती आणि आत्मविश्वास विकसित होतो. समाजात प्रभावी व्यक्तिमत्त्व निर्माण करण्यासाठी भाषणकला हा एक महत्त्वाचा शैक्षणिक घटक आहे.”

        स्पर्धेत एकूण १०३ विद्यार्थी सहभागी झाले होते. मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये विद्यार्थ्यांनी शिक्षण, संस्कार, तंत्रज्ञान, पर्यावरण संवर्धन, स्त्रीसक्षमीकरण आदी विषयांवर विचारपूर्ण मांडणी केली. काही विद्यार्थ्यांनी समाजातील वास्तवाचे उत्तम उदाहरणे देत उपस्थितांचे लक्ष वेधले.

        स्पर्धेचे परीक्षण एम. एम. गावडे, सतीश बोकडे, महादेव शिवणगेकर, रवि पाटील, बी. एन. पाटील, प्रा. तेलगोटे, एस. डी. सप्ताळे, के. डी. बारवेलकर आणि जयवंत पाटील या परीक्षक मंडळाने केले. परीक्षकांनी विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणाचे व भाषेवरील प्रभुत्वाचे विशेष कौतुक केले. या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांच्या संवादकौशल्य, विचारमांडणी आणि आत्मविश्वासाचा विकास होऊन त्यांच्या सर्वांगीण घडणीत नवा अध्याय जोडला गेला, असा एकमताने अभिप्राय व्यक्त करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय साबळे यांनी प्रभावीपणे केले तर आभार प्रदर्शन टी. एस. चांदेकर यांनी मानले. 

No comments:

Post a Comment