
वैभव पाटील (गटशिक्षणाधिकारी चंदगड)
तेऊरवाडी / एस. के. पाटील
चंदगडचे गटशिक्षणाधिकारी वैभव पाटील, सुनील पाटील आणि हंबीरराव कदम काही कामानिमित्त आंबोलीला जात होते. कानुर खुर्द (ता. चंदगड) च्या पुढे गेले असता दोन लहान मुली आणि त्यांचे आईवडील रस्त्याने मोठमोठ्याने रडत पळत सुटले वैभव पाटील यांनी पाहिले. मुली रडत असलेले पाहून गाडी थांबवून पाटील यांनी बघितले असता शेकडो मधमाश्या त्यांचा पाठलाग करून त्यांना चावत होत्या. हाताला, तोंडाला, डोक्यात चावा घेत होत्या आणि त्या वेदनेने ते चौधेजण ओरडत होते. ते भयानक दृष्य बघून वैभव पाटील यांनी समोरचा जीवघेणा धोका ओळखून त्या सर्वाना तात्काळ गाडीत बसवून कानूरच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात घेऊन आले.
लागलीच कानूर केंद्रशाळेचे शिक्षक बाबूराव शिवनगेकर यांना बोलवून रुग्ण वाहिका करून चंदगडला पाठविले. तेथून पुढील उपचारासाठी त्या चारही जणांना गडहिंग्लजमध्ये दाखल केले असून त्यांची प्रकृती ठीक असल्याचे समजते.
गटशिक्षणाधिकारी वैभव पाटील यांनी जर ही तत्परता दाखवली नसती तर कदाचित त्या चौघांचाही जीव धोक्यात होता. एक अधिकारी असूनही सर्वसामान्य जनतेचे प्राण वाचविणाऱ्या गटशिक्षणाधिकारी पाटील, सुनील पाटील व हंबीरराव कदम यांचे सर्वत्र कौतूक होत आहे.

No comments:
Post a Comment