चंदगड / सी एल वृत्तसेवा
मलतवाडी (ता. चंदगड) येथे हरिनाम सप्ताहानिमित्त स्वराज्य कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळ यांच्या वतीने मॅटवरील भव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ग्रामीण युवकांमध्ये क्रीडासंस्कृती वृद्धिंगत व्हावी, शारीरिक तंदुरुस्तीचा संदेश पोहोचावा व पारंपरिक खेळांना चालना मिळावी, या उद्देशाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
ही स्पर्धा शनिवार, २८ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजता तसेच रविवार, १ मार्च रोजी सकाळी १० वाजता आयोजित केली असून, चंदगड तालुका खरेदी-विक्री संघाच्या मलतवाडी शाखेजवळ स्पर्धा रंगणार आहे, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष सचिन चौगुले यांनी दिली.
स्पर्धेतील विजयी संघांना आकर्षक बक्षिसे देऊन गौरविण्यात येणार आहे. स्पर्धेच्या उद्घाटन समारंभ प्रसंगी मलतवाडीचे सुपुत्र व ठाण्याचे उपमहापौर कृष्णा दादू पाटील, नगरसेविका नंदा कृष्णा पाटील, जिल्हा परिषद सदस्या मानसी भोगण, संग्राम कुपेकर, विद्या विलास पाटील यांच्यासह पंचायत समिती सदस्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.
या सोहळ्यास आमदार शिवाजी पाटील, माजी आमदार राजेश पाटील, माजी मंत्री भरमू पाटील, नंदा बाभुळकर, चंदगड नगराध्यक्ष सुनील काणेकर, चंदगड पोलीस निरीक्षक विश्वास पाटील, शिवसेना जिल्हाध्यक्ष सुनील शिंत्रे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे. या स्पर्धेमुळे ग्रामीण भागातील युवकांना क्रीडागुण दाखवण्याची संधी मिळणार असून, सामाजिक सलोखा व क्रीडाभावना वृद्धिंगत होण्यास चालना मिळणार आहे. अधिकाधिक संघांनी सहभागी होऊन या क्रीडामहोत्सवाची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

No comments:
Post a Comment