सॉफ्ट स्किल्स हीच यशाची गुरुकिल्ली - माडखोलकर महाविद्यालयात डॉ. आरबोळे यांचे मार्गदर्शन - चंदगड लाईव्ह न्युज

25 February 2026

सॉफ्ट स्किल्स हीच यशाची गुरुकिल्ली - माडखोलकर महाविद्यालयात डॉ. आरबोळे यांचे मार्गदर्शन


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

        चंदगड येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालयात इंग्रजी विभागाच्या वतीने 'रोजगारक्षमतेसाठी सॉफ्ट स्किल्स' या विषयावर विशेष मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, कोवाड येथील इंग्रजी विभागप्रमुख डॉ. ए. एस. आरबोळे उपस्थित होते.

डॉ. आरबोळे यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सॉफ्ट स्किल्सचे महत्त्व, संवादकौशल्य, नेतृत्वगुण, वेळेचे व्यवस्थापन, संघभावना, सकारात्मक दृष्टिकोन आणि समस्या सोडविण्याची क्षमता अशा विविध सॉफ्ट स्किल्सचे सविस्तर विश्लेषण केले. "आजच्या स्पर्धात्मक युगात केवळ शैक्षणिक गुणवत्ता पुरेशी नाही, तर व्यक्तिमत्त्व विकास आणि प्रभावी संवादकौशल्याला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे," असे त्यांनी नमूद केले. स्वतःजवळील तांत्रिक ज्ञान जागतिक बाजारपेठेत प्रभावीपणे मांडण्यासाठी सॉफ्ट स्किल्स अत्यंत आवश्यक असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

        कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. एस. डी. गोरल होते. बदलत्या जगाचा वेग लक्षात घेता कौशल्य विकास ही काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी वेळीच ही कौशल्ये आत्मसात करून स्वतःचा आत्मविश्वास वाढवावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

        प्रारंभी डॉ. के. तेलगोटे यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. तांत्रिक कौशल्यासोबतच सॉफ्ट स्किल्स आत्मसात केल्यास रोजगाराच्या संधींमध्ये लक्षणीय वाढ होते, असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे संयोजक डॉ. एन. के. पाटील यांनी सूत्रसंचालन करताना विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि बदलत्या बाजारपेठेतील स्पर्धेसाठी या कार्यक्रमाचे महत्त्व अधोरेखित केले.

        या कार्यक्रमाला विद्यार्थी-विद्यार्थिनी व प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांचे आभार कु. रोहिणी कांबळे हिने मानले.

No comments:

Post a Comment