चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
"सुळये गावच्या ग्रामस्थांनी दिलेले प्रेम, आई-वडिलांनी दिलेली सुसंस्कारांची शिदोरी, गुरुजनांचे मार्गदर्शन यांच्या बळावरच मी यशस्वी होऊ शकले "असे प्रतिपादन राधानगरीच्या तहसीलदार अनिता देशमुख- भूतल यांनी केले. सुळये (ता. चंदगड) येथे ग्रामस्थांनी आयोजित केलेल्या सत्कार समारंभात बोलत होत्या. अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते शिवानंद हुंबरवाडी होते.
त्यापुढे म्हणाल्या की, "सकारात्मक विचारसरणी ठेवून ध्येयप्राप्तीसाठी अथक प्रयत्न केल्यास यश दूर नाही. तरुणांनी परिश्रमपूर्वक स्पर्धा परीक्षेची तयारी करायला हवी". प्रारंभी ग्रामदैवत श्री देव भैरवनाथ येथे पुरोहित संतोष जोशी यांच्या हस्ते अभिषेक व धार्मिक विधी संपन्न झाले. सौ. देशमुख- भूतल यांनी चांदीचा हार, कर्णफुले, सुवर्ण भिकबाळी देवाला अर्पण केली.
प्रास्ताविकात एस. आर. देशमुख यांनी सत्कार समारंभाचा हेतू विशद केला. प्रतिकूल परिस्थितीवर जिद्दीने मात करून आपण केलेल्या कार्याचा व गतस्मृतींचा आढावा घेतला. याप्रसंगी देशमुख कुटुंबीयांच्या व गावकऱ्यांच्या वतीने नूतन जिल्हा परिषद सदस्य रचना राहुल गावडे व पंचायत समिती सदस्य संज्योती संतोष मळवीकर व मनस्विनी महादेव कांबळे यांचा सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना नूतन सदस्यांनी समाजकारणाला प्राधान्य देऊन विकासाची कामे करण्यावर व जनसामान्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यास आपण कटिबद्ध राहू. सुळये गावच्या ग्रामस्थांच्या सर्व अडचणींचे निराकरण करून ग्राम विकासाला सर्वतोपरी योगदान देऊ असे आश्वासन दिले.
यावेळी अध्यक्ष शिवानंद हुंबरवाडी यांनी देशमुख सरांच्या सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक कार्याचा आढावा घेतला. प्रगतशील शेतकरी म्हणून सरांनी केलेले नवनवीन प्रयोग, समन्वयशीलता तसेच चंदगड अर्बन बँकेचे संचालक व पंचायत समिती सदस्य म्हणून त्यांनी जनसामान्यांच्यासाठी केलेले कार्य कौतुकास्पद असल्याची भावना व्यक्त केली. सुळये गावची व देशमुख सरांशी माझे जुने ऋणानुबंध असल्यामुळेच त्यांच्या सत्कार सोहळ्यास आपण आगत्यपूर्वक उपस्थित राहिल्याची भावना व्यक्त केली.
यावेळी आजरा पंचायत समितीचे माजी सदस्य निवृत्ती कांबळे व माजी जिल्हा परिषद शिक्षण सभापती भरमाण्णा गावडे यांनी मनोगते व्यक्त केली. या कार्यक्रमासाठी सुळये गावातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मंडळाचे सर्व सदस्य तसेच गावातील तरुण मंडळ, ज्येष्ठ नागरिक चन्नापा गावडे, महादेव धुरी, गोविंद देशमुख, भैरवनाथ कांबळे, सुधाकर कांबळे, राजा कांबळे, विलास गावडे, कुमार कांबळे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थिती होते.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी कोल्हापूर च्या अरुण नरके फाऊंडेशनचे प्रा. किरण कामत, संदीप भोगुलकर यांनी सहकार्य केले. सूत्रसंचालन ए. डी. कांबळे यांनी तर आभार एस. व्ही. कुलकर्णी यांनी मानले. कार्यक्रमाच्या शेवटी देशमुख कुटुंबियांच्या वतीने स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते.




No comments:
Post a Comment