
पारगड किल्ल्याच्या पश्चिमेकडून कोकणात जाणारा रखडलेल्या अवस्थेतील पारगड मोर्ले रस्त्याचे छायाचित्र
संपत पाटील - चंदगड : सी एल वृत्तसेवा
राजमार्ग १८७ किल्ले पारगड ते मोर्ले हा ८ किमी लांबीचा रस्ता शासकीय विभागांच्या अनास्थेमुळे ६ वर्षांपासून रखडला आहे. या मार्गाचे काम २४ फेब्रुवारीपासून सुरू न केल्यास २५/०२/२०२६ पासून सार्वजनिक बांधकाम विभाग दोडामार्ग कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा निर्णय पारगड व मोर्ले परिसरातील ग्रामस्थांनी घेतल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते रघुवीर खंडोजी शेलार (पारगड) व प्रवीण सिताराम नाईक भेडशी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. याबाबतचे निवेदन सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर व चंदगडचे आमदार शिवाजीराव पाटील यांना दिले आहे.
सह्याद्रीच्या डोंगररांगांनी छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याचे रक्षण केले. त्याच डोंगर कडेकपारीत पारगड किल्ला परिसरात राहणारे मावळे आज सरकारी अनास्थेच्या गर्तेत अडकले आहेत. परिसरातील २० गावांची मागणी असलेल्या पारगड किल्ला ते मोर्ले रस्त्यासाठी गेली चार दशके ग्रामस्थ आंदोलने सुरू आहेत. या रस्त्यासाठी आमदार केसरकर यांच्या माध्यमातून पाच वर्षांपूर्वी पाच कोटीहून अधिक रुपये या कामी खर्ची पडले आहेत. यातून रस्ता सपाटीकरण व मार्गावरील मोऱ्यांचे काम पूर्ण झाले होते. तथापि त्यानंतर ५ वर्षे काम रखडल्याने खर्च झालेला निधी वाया जाण्याची शक्यता आहे.
गेल्या पंधरा-वीस वर्षात या रस्त्यासाठी आमरण उपोषणे, लाक्षणीक उपोषणे, ठिय्या, धरणे, रस्ता रोको अशी तब्बल ३५ आंदोलने झाली. प्रत्येक वेळी सिंधुदुर्ग व कोल्हापूर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी तसेच सार्वजनिक बांधकाम व वन विभाग विभागाचे अधिकारी यांच्याकडून केवळ आश्वासने देऊन आंदोलकांची बोळवण झाली आहे. प्रत्येकवेळी बांधकाम विभाग व वन विभाग एकमेकांकडे बोटे दाखवण्यात धन्यता मानत आहेत. दोन्हीं कडील लोकप्रतिनिधींच्या मनात नेमके काय आहे? असा संतप्त सवाल आंदोलकांनी केला आहे.
गेल्या पंधरा-वीस वर्षात सार्वजनिक बांधकाम विभाग चंदगड दोडामार्ग सावंतवाडी तसेच वन विभाग चंदगड सावंतवाडी दोडामार्ग आदी ठिकाणी व जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर पर्यंत आंदोलने झाली आहेत. प्रत्येक वेळी अधिकारी व लोकप्रतिनिधी यांची उदासीनताच यांच्या उदासीनेतेमुळे आंदोलकांच्या पत्रे निराशा आली आहे.
दरम्यान हा रस्ता झाल्यास आंबोली व किल्लारी या धोकादायक घाटांना पर्यायी मार्ग म्हणून ठरणार असून यामुळे कोल्हापूर व बेळगाव ते पणजी हे अंतर २५ ते ३० किलोमीटरने कमी होणार आहे. या मार्गावर धोकादायक घाट नसल्यामुळे कमी इंधन व वेळेची बचत वेळेच्या बचतीबरोबरच प्रवासातील धोके ९० टक्के पर्यंत कमी होणार आहेत.
गेली २५-३० वर्षे या रस्त्यासाठी धडपडणाऱ्या इतिहास प्रसिद्ध शेलारमामा यांचे वंशज रघुवीर शेलार यांनी मुंबई, नागपूर, कोल्हापूर, चंदगड, सिंधुदुर्ग, सावंतवाडी येथील वन व बांधकाम विभागाचे उंबरठे झिजवले पण अद्याप यश आले नाही. त्यामुळे ८० वर्षे वयाच्या या शेजारामांनी या उपोषणाच्या माध्यमातून प्रशासनाला निर्वाणीचा इशारा दिला आहे.
परिसरातील भूमिपुत्रांना रोजगाराच्या संधी
हा रस्ता झाल्यास चंदगड तालुक्यातील हेरे, मोटणवाडी, पाटणे, वाघोत्रे, इसापूर, पारगड, मिरवेल, नामखोल, तसेच दोडामार्ग तालुक्यातील तेरवण, पेंढारवाडी, मोर्ले, घोटगेवाडी पासून भेडशीपर्यंतच्या सर्व २०-२५ गावातील तरुणांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. तसेच शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या इतिहास प्रसिद्ध अजिंक्य किल्ले पारगड वर येणाऱ्या महाराष्ट्र कर्नाटक व गोव्यातून येणाऱ्या पर्यटकांची गैरसोय दूर होणार आहे. या सर्व बाबींचा विचार करता रस्ता तात्काळ पूर्ण होणे काळाची गरज बनली आहे.
No comments:
Post a Comment