एमडी ड्रग्ज प्रकरणामध्ये म्हाळेवाडीच्या तरुणाला अटक, चंदगड एमडी ड्रग्ज प्रकरणी पुन्हा चर्चेत, तालुक्यात खळबळ - चंदगड लाईव्ह न्युज

28 December 2025

एमडी ड्रग्ज प्रकरणामध्ये म्हाळेवाडीच्या तरुणाला अटक, चंदगड एमडी ड्रग्ज प्रकरणी पुन्हा चर्चेत, तालुक्यात खळबळ

 


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

        राज्यातील अमली पदार्थ तस्करी विरोधात स्थापन केलेल्या सात गटापैकी कोकण कृती गटाने वाशी मुंबई येथे कारवाई करत आंतरराज्य टोळीचा पर्दापाश केला. यामध्ये वाशी येथील एमडी ड्रग्ज कारखाना प्रकरणात चंदगड तालुक्यातील म्हाळेवाडी येथील तरुणाचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याचे समजल्यानंतर पोलीसांनी शुक्रवारी (ता. २६) रात्री म्हाळेवाडीत धडक कारवाई करत म्हाळेवाडी (ता. चंदगड) येथील संशयित प्रशांत पाटील याला त्याच्या रहात्या घरातून अटक केली आहे. या कारवाईमुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. 

    प्रशांत पाटील हा मुळचा चंदगड तालुक्यातील म्हाळेवाडीचा असून तो सद्या बेळगाव येथे वास्तव्याला आहे. त्याने बीएससीपर्यंत शिक्षण पूर्ण केले आहे. तो एका केमिकल कंपनीमध्ये कामाला होता. महाराष्ट्रातील अमली पदार्थविरोधी टास्क फोर्स पथकाने राज्यात कारवाई केली असता प्रशांत पाटील याचे नाव पुढे आले आहे. यातून पोलीसांनी त्याला अटक केली आहे.

राज्य गुन्हे अन्वेषण पुणे विभागाचे अप्पर पोलिस महासंचालक सुनिल रामानंद, विशेष पोलिस महानिरिक्षक शारदा राऊत, पोलिस उपनिरीक्षक प्रवीणकुमार पाटील, एम. एम. मकानदार, कृष्णात पिंगळे, रामचंद्र मोहिते, संतोष गावशेते व नीलेश बोधे यांच्यासह पथकाने हि कारवाई केली आहे. 

        यापूर्वी २०२२ मध्ये ढोलगरवाडी येथे एमडी ड्रग्ज कारखाना व एका पोल्ट्रीमध्ये कारवाई झाली होती. या प्रकरणामुळे पुन्हा एकदा चंदगड तालुका राज्यात चर्चेत आला आहे. 

No comments:

Post a Comment