गोवा बनावटीच्या दारूसह १२ लाख १८ हजारांचा मुद्देमाल जप्त, चंदगड पोलिसांची मोठी कारवाई, तिघांवर गुन्हा नोंद - चंदगड लाईव्ह न्युज

03 December 2025

गोवा बनावटीच्या दारूसह १२ लाख १८ हजारांचा मुद्देमाल जप्त, चंदगड पोलिसांची मोठी कारवाई, तिघांवर गुन्हा नोंद

  

संग्रहित छायाचित्र

चंदगड : सी एल वृत्तसेवा

        ऐन नगरपंचायत निवडणुकीच्या धामधुमीत गोवा बनावटीच्या दारूसह १२ लाख १८ हजारांचा मुद्देमाल चंदगड पोलिसांनी पाठलाग करून जप्त केला. ही घटना तिलारी नगर चंदगड मार्गावर हेरे ते ताम्रपर्णी नदी पुल दरम्यान घडली. दि. २९ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी २ वाजताचे सुमारास हेरे येथे हि घटना घडली. या प्रकरणी संशयित तिघांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

   जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी कोल्हापूर यांनी नगरपंचायत, नगरपालिका, नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकांच्या अनुषंगाने २५ नोव्हेंबर ते ७ डिसेंबर अखेर कोल्हापूर जिल्ह्यात महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ एक (अ) ते (फ) अन्वये जिल्ह्यात बेकायदेशीर वर्तन करणे, शस्त्र बाळगणेस मनाई आदेश दिलेला आहे. असे असताना दिनांक २९ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी २ वाजता चे सुमारास हेरे येथे गोवा बनावटीची बेकायदेशीर दारू वाहतूक करणाऱ्या तिघा संशयितांवर चंदगड पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. 

          वाशिम फारुख देसाई (चंदगड पोलीस) यांच्या फिर्यादीवरून जोतिबा वैजू चव्हाण वय २९ वर्षे (गाडी चालक), संतोष मारुती चव्हाण वय २८ व महांतेश मल्लाप्पा देसाई वय २६ सर्व राहणार मूरकुटेवाडी, पोस्ट मजरे कारवे, तालुका चंदगड यांच्यावर महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ अ, ई, ८३, ९०, १०८ सह शस्त्र अधिनियम १९५९ चे कलम ४,२५ आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

         याबाबत चंदगड पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी, वरील संशयित आरोपी आपल्या ताब्यातील महिंद्रा कंपनीची सिल्वर रंगाची कार घेऊन महाराष्ट्र शासनाचा कर चुकवण्याच्या उद्देशाने गोवा बनावटीच्या दारूच्या डीएसपी ब्लॅक व्हिस्की, गोल्डन आईस ब्ल्यू फाईन व्हिस्की आदी वेगवेगळ्या कंपनीच्या व किमतीच्या सीलबंद बाटल्या ज्यांची किंमत अंदाजे रुपये १७ हजार ७६०, वाहनात भरून बिगर परवाना विक्रीच्या उद्देशाने चालले होते. हे संशयित वाहन हेरे गावातील चौकात आले असताना पोलिसांनी वाहनास थांबण्यातचा इशारा केला. तथापि वाहन न थांबता हेरे ते चंदगड येथील ताम्रपर्णी नदी पूल असे भरधाव वेगात चालवून दहशत माजवण्याचे हेतूने आपल्या कब्जातील बेकायदेशीर शस्त्र तलवार व लोखंडी टॉमी बाळगून मनाई आदेशाचे उल्लंघन केले. यावरून त्यांना पोलीसांनी पाठलाग करुन वाहन मुद्देमालसह ताब्यात घेतले. त्यांच्याकडील सुमारे १२ लाख १८ हजार १६९ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार विलास गेंगजे व त्यांच्या पथक पथकाने केले. ही घटना दिनांक २९ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी २ वाजता घडली. सर्व संशियितांवर त्याच दिवशी सायंकाळी सहा वाजता गुन्हा नोंद केला असून कोर्टासमोर उभे केले असता. संशयित आरोपी यांना ३ डिसेंबर अखेर पोलीस कोठडी रिमांड मंजूर करण्यात आला आहे.

         ऐन नगरपंचायत, नगरपालिका, नगरपरिषद निवडणुकीच्या धामधुमीत घडलेल्या या घटनेने चंदगड तालुका व उपविभागात हा चर्चेचा विषय ठरला आहे.

No comments:

Post a Comment