चंदगड : सी एल वृत्तसेवा
राज्यात दि. २ डिसेंबर २०२५ रोजी मतदान झालेल्या सर्व नगरपंचायत, नगरपालिका, नगरपरिषद निवडणुकांची मतमोजणी लागलीच दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्या दिनांक ३ डिसेंबर रोजी होणार होती. तथापि उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने या निवडणुकांची मतमोजणी आता २१ डिसेंबर रोजी म्हणजे तब्बल १८ दिवसानंतर घेण्याचा आदेश दिला आहे.
विविध कारणास्तव राज्यातील २४ ठिकाणच्या निवडणुका निवडणूक आयोगाने ऐनवेळी पुढे ढकलून या निवडणुकांच्या मतदानाची तारीख २० डिसेंबर ही ठरवली होती. त्यामुळे ३ तारीख ला मतमोजणी झाल्यास त्या निकालांचे परिणाम २० डिसेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकांच्या मतदानावर होणार असल्याच्या अनेक तक्रारी न्यायालयाकडे प्राप्त झाल्या होत्या. यावरील सुनावणीनंतर उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने हा निकाल दिला आहे.
न्यायालयाच्या या निकालामुळे विविध राजकीय पक्षांचे नेते, उमेदवार यांची डोकेदुखी मात्र वाढणार असे वाटते. ३ रोजी निकाल लागला असता तर विजयी व पराभूत सर्वच उमेदवारांचे समर्थक दुसऱ्या दिवसापासून (झाले गेले विसरून?) आपापल्या नियमित कामासाठी लागले असते. मात्र निकाल लांबणीवर पडल्यामुळे प्रत्येक उमेदवाराच्या घरी पै पाहुणे, कार्यकर्ते, समर्थकांची वर्दळ राहणार आहे. चौकाचौकात, गल्लीतील कट्ट्यावर, उमेदवारांच्या घरी संभाव्य निकालाबाबत तर्क वितर्क (कुतर्क) लढविण्यात पुढचे १८ दिवस जाणार आहेत. याचा मनस्ताप संभाव्य विजयी किंवा पराभूत होणाऱ्या दोन्ही उमेदवार व त्यांच्या कुटुंबीयांना सहन करावा लागणार आहे. उमेदवारांच्या घरी भेट देणाऱ्या कार्यकर्ते व समर्थकांची नाईलाजाने का होईना १८ दिवस संबंधित उमेदवाराला 'सोय' करावी लागू शकते.
एकंदरीत चंदगड नगरपंचायतीच्या निवडणुकीत मुख्यमंत्री व कॅबिनेट मंत्री आमने-सामने मैदानात उतरले. याशिवाय दोन्ही बाजू कडून आजी-माजी आमदार, मंत्री ८ दिवस प्रचारात आघाडी सांभाळत होते. यामुळे निवडणुकीत अभूतपूर्व चुरस पाहायला मिळाली. हजार दोन हजार किलोमीटर अंतरावरूनही मतदारांना निवडणुकीत मतदानासाठी आणले गेले. साम दाम दंड भेद सह अनेक प्रलोभनांची चर्चा मतदानाच्या आधी व नंतर ही सुरू राहिली आहे. चंदगड नगरपंचायत मतदानाची टक्केवारी ८४ टक्के च्या आसपास दिसत असली तरी मतदार यादीतील मयत मतदारांची संख्या पाहता ही टक्केवारी तब्बल ९८ टक्के पर्यंत जाईल अशी चर्चा मतदान अधिकारी पथकांतील सदस्यांसह कार्यकर्त्यांमध्ये सुरू होती.
No comments:
Post a Comment