चंदगड नगरपंचायतीसाठी चुरशीने ८४ टक्के शांततेत मतदान, आता निकालाकडे लक्ष.......... - चंदगड लाईव्ह न्युज

02 December 2025

चंदगड नगरपंचायतीसाठी चुरशीने ८४ टक्के शांततेत मतदान, आता निकालाकडे लक्ष..........

 

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

        चंदगड नगरपंचायतीसाठी आज मतदानाच्या दिवशी ८४.०८ टक्के चुरशीने मतदान झाले. वाढलेली टक्केवारी ही कोणाच्या फायद्याची याचा फैसला २१ डिसेंबर रोजीच्या निकालाच्या दिवशी स्पष्ट होणार आहे. १७ मतदान केंद्रावर ३ नगराध्यक्ष पदाचे उमेदवार व ५७ नगरसेवक पदाचे उमेदवार यांचे भवितव्य आज मतपेटीत बंद झाले. ८३१५ पैकी ६९९१ मतदारांनी मतदानाची हक्क बजावला. कोठेही अनुचित प्रकार न घडता मतदान सुरळीत पार पडल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी व तहसीलदार राजेश चव्हाण यांनी दिली.

    सकाळच्या सत्रात मतदारांनी मतदान केंद्रावर रांगा लागल्या होत्या. मात्र सकाळी अकरा वाजल्यापासून ते चार वाजेपर्यंत तुरळक मतदार मतदानाला येत होते. चार वाजल्यानंतर मात्र थोडी गर्दी मतदान केंद्रावर बघायला मिळाली. एकेका मतासाठी उमेदवार मतदारांना दुचाकी, चारचाकी वाहनातून घेवून येऊन येत होते. उमेदवारांचे प्रतिनिधी व उमेदवारही दिवसभर मतदारांच्या संपर्कात होते. मतदार यादी तपासून किती मतदार राहिलेत. याची वारंवार तपासणी केली जात होती. 

    नगराध्यक्ष पदासाठीचे भाजपचे उमेदवार सुनील काणेकर व राजर्षी शाहू विकास आघाडीचे उमेदवार दयानंद काणेकर, बहुजन समाज पक्षाचे श्रीकांत कांबळे यांच्यासह नगरसेवक पदासाठी ५७ उमेदवारांना येथील मतदार राजा कसा कौल देणार याकडे चंदगडकरांचे लक्ष लागून आहे.

    यंदा या निवडणुकीत मोठी चुरस आणि इर्षा होती. एकूण १७ मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली होती. मतदानाच्या आधी आधी मॉक पोलद्वारे मतदान यंत्रांची चाचणी घेण्यात आली. यावेळी २ मतदान यंत्रे बदलून देण्यात आली.

        नगरपंचायत कार्यक्षेत्रात भाजप शिवसेना युतीकडून आमदार शिवाजी पाटील, लक्ष्मण गावडे, ॲड. विजय कडुकर, श्रीशैल नागराळ, माजी सभापती शांताराम बापू पाटील, भाजपचे माजी तालुकाध्यक्ष नामदेव पाटील, रवींद्र बांदिवडेकर, दिग्वीजय देसाई, अमेय सबनीस यांच्यासह राजर्षी शाहू आघाडीकडून माजी आमदार राजेश पाटील, प्रवीण वाटंगी, राजेंद्र परीट, संजय चंदगडकर, राष्ट्रीय काँग्रेसचे नेते गोपाळराव पाटील,  संभाजीराव देसाई - शिरोलीकर, विक्रम चव्हाण - पाटील, एम. जे. पाटील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या नेत्या डॉ. नंदा बाभुळकर हे केंद्रांना भेट देवून माहिती घेत होते. तसेच भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुनील काणेकर, विरोधी शाहू आघाडीचे उमेदवार दयानंद काणेकर व बसपाचे श्रीकांत कांबळे यांच्या नगरसेवक पदाचे सर्व उमेदवारही विविध मतदान केंद्रांना भेट देत होते. 

        मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार राजेश चव्हाण, नगर प्रशासन अधिकारी स्वप्निल राणे, किरण कोकीतकर, अमित जाधव मतदानाची टक्केवारी जाहीर करण्यात येत होती. निवडणूक निरीक्षक हेमंत निकम यांच्यासह डीवायएसपी रामदास इंगवले, पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांनी मतदान केंद्रांना भेटी देऊन कायदा व सुव्यवस्थेबाबत कनिष्ठ अधिकारी व पोलीस कॉन्स्टेबल यांना सूचना दिल्या. स्थानिक पोलीस कर्मचारी तसेच कोल्हापूर येथील जादाची कुमक मागून घेण्यात आली होती.

        चंदगड येथे  कुमार शाळा रवळनाथ गल्ली केंद्र क्र. ११ येथे पिंक मतदान केंद्र म्हणून व्यवस्था तर लक्ष्मीनगर येथे केंद्र क्र. ३ हे आदर्श मतदान केंद्र स्थापन करण्यात आले.

        माजी आमदार राजेश पाटील, गोपाळराव पाटील, डॉ. नंदा बाभुळकर, एम. जे. पाटील यांनी यांच्यासह अन्याय नेते एकत्र येत राजर्षी शाहू विकास आघाडी विरोधात भाजपचे आमदार शिवाजी पाटील व शिवसेना यांची युती रिंगणात होती पंधरा जागा भाजपला व शिवसेनेला दोन जागा देण्यात आल्या आहेत. आता २१ डिसेंबर रोजी कोणावर गुलाल उधळणार हे निश्चित होईल.

       सकाळच्या सत्रात ७.३० ते ९.३० पर्यंत १३ टक्के, ९.३० ते ११.३० वाजता ३२.७१, ११.३० ते १.३० पर्यंत ५४.४६ टक्के, १.३० ते ३.३० पर्यंत ७१.२६ टक्के मतदान झाले होते. सायंकाळी ५.३० ला ८४.०८ टक्के मतदान झाले. 

    केंद्रनिहाय मतदानाची आकडेवारी व टक्केवारी पुढीलप्रमाणे..........



No comments:

Post a Comment