![]() |
| आजरा येथील याच घराचे पाडकाम सुरू असताना ही दुर्दैवी घटना घडली. |
आजरा : सी एल वृत्तसेवा
आजरा येथे जुने घर पाडले जात असताना अंगावर भिंत कोसळून महाविद्यालयातील प्राध्यापिका व एका शाळकरी मुलीचा जागीच मृत्यू झाला. घटनेत एक महिला गंभीर जखमी झाली आहे. सोमवार दिनांक 20 एप्रिल 2026 रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास घडलेल्या या घटनेबद्दल घर काढणारे ठेकेदार, जेसीबी चालक अशा एकूण तिघांवर आजरा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
याबाबत पोलिसातून समजलेली अधिक माहिती अशी, आजरा येथे महागाव रोडवर वरील डॉक्टर अनिल देशपांडे यांचे घर जुने घर पाडण्याचे काम सुरू होते. या कामाचा ठेका अभिजीत बाबुराव हुक्केरी व विनोद पांडुरंग मोहिते (राहणार आजरा) यांनी घेतला होता. जेसीबी चालक म्हणून मिथुन चव्हाण (राहणार विजापूर, कर्नाटक) काम करत होता.
भिंती पाडण्याच्या कामाच्या वेळी प्राध्यापिका ज्योती नितीन कुंभार वय ४२ (मुळगाव पारेवाडी), कु. वैष्णवी तुकाराम भोसले वय १३ व ललिता तुकाराम भोसले वय ४५ (रा. आजरा) या मायलेकी पाडकाम सुरू असलेल्या घराजवळून जात होत्या. यावेळी त्यांच्या अंगावर मोठी भिंत कोसळल्यामुळे त्या मातीच्या ढिगार्याखाली गाडल्या गेल्या. यात वरील दोघींचा हृदयद्रावक मृत्यू झाला तर ललिता भोसले या गंभीर जखमी झाल्या. याप्रकरणी ठेकेदार व जेसीबी चालक अशा तिघांवर सुनील पांडुरंग कुंभार यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याबाबत आजरा पोलीस अधिक तपास करत आहेत.
महिला ढिगार्याखाली गाडीला गेल्यानंतर तात्काळ मदत कार्य हाती घेण्यात आले. तिघींना ग्रामीण रुग्णालयात नेले असता अधीक्षक डॉ. अमोल पाटील व अन्य डॉक्टरांनी रुग्णांची तपासणी करून प्राध्यापिका ज्योती व वैष्णवी यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे घोषित केले. तर ललिता यांच्यावर उपचार सुरू आहेत.
घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. नगराध्यक्ष अशोक चराटी, मुख्याधिकारी सुरज सुर्वे, तहसीलदार समीर माने, नायब तहसीलदार विकास कोलते, डी वाय एस पी व पोलीस अधिकाऱ्यांनी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.

No comments:
Post a Comment