कालकुंद्रीच्या जान्हवी पाटीलचा यशाचा मुंबईमध्ये डंका- बालवैज्ञानिक पुरस्कारासह जिंकले गोल्ड मेडल - चंदगड लाईव्ह न्युज

22 April 2026

कालकुंद्रीच्या जान्हवी पाटीलचा यशाचा मुंबईमध्ये डंका- बालवैज्ञानिक पुरस्कारासह जिंकले गोल्ड मेडल

  


तेऊरवाडी / एस के पाटील - सी एल वृत्तसेवा

      दि ग्रेटर सायन्स टीचर्स असोसिएशन मुंबई यांचेकडून घेतल्या जाणाऱ्या प्रतिष्ठेच्या डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक 2025- 26  या राज्यस्तरीय स्पर्धेत कालकुंद्री (ता. चंदगड) येथील  कु. जान्हवी विश्वास पाटील हिने सुवर्णपदक, रु. 25000/- स्कॉलरशिपसह 'बालवैज्ञानिक' हा पुरस्कार प्राप्त करून महाराष्ट्र राज्याची राजधानी मुंबई गाजवली. यशवंत नाट्य मंदिर, माटुंगा- मुंबई येथे पार पडलेल्या बक्षीस वितरण समारंभात "संरक्षण संशोधन आणि विकास संस्था , दिल्ली" अर्थात डीआरडीओ चे शास्त्रज्ञ डॉ.अशोक नगरकर , डॉ. मधुबाला चांदुरकर व संस्थेचे अध्यक्ष अच्युतराव माने यांच्या हस्ते 'बालवैज्ञानिक 'या पुरस्काराने जान्हविला गौरविण्यात आले .

    जान्हविने अक्षय ऊर्जा कार्यक्षमतेच्या स्तोत्रांचे मूल्यांकन *या प्रमुख विषयांतर्गत "कुजलेल्या अवशेषांपासून निळ्या ज्योतीकडे : बायोगॅस कार्यक्षमतेच्या नव्या वाटेचा वैज्ञानिक प्रवास ..." या शीर्षका अंतर्गत कृती संशोधन प्रकल्प अहवाल सादर केला होता. राज्यस्तरावरील तब्बल १ लाख २०हजार मुलांमधून लेखी परीक्षा, प्रात्यक्षिक, कृती संशोधन व मुलाखत( VIVA) असे स्पर्धेतील चार टप्पे यशस्वी पणे पार करत तिने दैदीप्यमान कामगिरी केली. प्रात्यक्षिक परीक्षेच्या फेरीत कोल्हापूर विभागातील पाच जिल्ह्यात तिने प्रथम क्रमांक मिळवला होता . ती सध्या राणी पार्वतीदेवी हायस्कूल सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग या शाळेत इयत्ता नववीच्या वर्गात शिकत आहे. या यशासाठी तिला युरेका सायन्स क्लबच्या डॉ.सुषमा केणी,भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान चे डॉ. प्रसाद देवधर, मुख्याध्यापिका श्रीम.संप्रवी कशाळीकर , विज्ञान शिक्षक दशरथ शृंगारे ,विज्ञान शिक्षिका  तसेच तिचे वडील . विश्वास शामराव पाटील व आई सौ. वैशाली पाटील यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले . चंदगड सारख्या ग्रामिण भागातील तेऊरवाडी व 

    कालकुंद्री येथे राहून आकाशाला गवसणी घालणाऱ्या कु जान्हवीचा शैक्षणिक, सामाजिक, व राजकीय या सर्व क्षेत्रातून अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

No comments:

Post a Comment