चंदगड : श्रीकांत पाटील / सी एल वृत्तसेवा
भटक्यांचे शिक्षण व त्यांच्या सामाजिक उन्नतीसाठी झटणारे शिक्षक म्हणून बागिलगे शाळेचे उपक्रमशील शिक्षक व रामपूर (ता. चंदगड) गावचे रहिवासी बाबुराव वरपे जिल्ह्यात परिचित आहेत. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त वर्पे यांनी व्यवसायाच्या निमित्ताने भटकंती करणाऱ्या भटक्या कुटुंबांच्या पालावर जाऊन त्यांना कपडेलत्ते, प्रापंचिक साहित्य तसेच मुलांना खाऊ व शैक्षणिक साहित्य वाटप केले.
![]() |
| भटक्या कुटुंबांच्या पालावर जाऊन त्यांना जिवनोपयोगी साहित्य व मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप करताना बाबुराव वर्पे |
भटक्या कुटुंबातील मुलांना शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी वेळोवेळी भटक्यांच्या शैक्षणिक परिषदांचे आयोजन केले आहे. प्रत्येक वेळी मान्यवरांच्या मार्गदर्शनाबरोबरच उपस्थित भटक्या कुटुंबातील स्त्री, पुरुष व मुलांना लागणारे कपडे, साड्या, जीवनोपयोगी साहित्य व शैक्षणिक साहित्याचे वाटप सुरू असते. या परिषदा राज्यभरात लक्षवेधी ठरल्या असून या परिषदांना मान्यवरांनी उपस्थिती लावून वरपे यांच्या कार्याचे कौतुक केले आहे.
कोल्हापूर जिल्हा परिषदेचे शिक्षक म्हणून विद्या मंदिर येणेचवंडी (ता. गडहिंग्लज) येथून शैक्षणिक सेवेची सुरुवात केली. गेल्या ३२ वर्षांत त्यांनी मौजे जट्टेवाडी, वरगाव, बेरडवाडा अशा शाळांमध्ये काम करताना शिक्षणापासून वंचित घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षण प्रवाहात आणून ती मुले शाळेत रमतील यासाठी त्यांना स्वखर्चाने सुविधा देण्यावर भर दिला. येणेचवंडी व मौजे जट्टेवाडी शाळांना जिल्हा व राज्यस्तर गौरव मिळवून दिला. वरपे यांच्या निरंतर सुरू असलेल्या या धडपडीची दखल शासनाबरोबरच अनेक सेवाभावी संस्थांनी घेतली असून त्यांच्यावर पुरस्कारांचा वर्षाव होत आहे.
त्यांना आतापर्यंत कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या आदर्श शिक्षक पुरस्कारासह जिल्हा व राज्यस्तरावरील अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. यात डॉ.जे.पी.नाईक गुणवंत शिक्षक पुरस्कार, सत्यमेव सेवा फौंडेशन मुंबई चा 'शिक्षकरत्न' पुरस्कार, महात्मा फुले प्रतिष्ठान कोल्हापूर-पुणेचा 'राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार', त्रिवेणी प्रतिष्ठाण बहिरेवाडी-आजरा यांचा- डॉ.जे.पी.नाईक गुणवंत शिक्षक पुरस्कार, सर्वोदय शैक्षणिक संस्था गगनबावडा -कोल्हापूरचा 'गुरुदेव' पुरस्कार आदी पुरस्कारांचा समावेश आहे. या पुरस्कारांमुळे त्यांच्या कार्याची उंची अधोरेखित झाली आहे. वरपे यांच्या आगळ्यावेगळ्या कार्याची दखल घेवून महाराष्ट्राचे वैद्यकीय शिक्षण मंत्री ना. हसन मुश्रीफ, माजी आमदार राजेश पाटील ,पंचायत समिती सभापती विलास नाईक, माजी जिल्हा परिषद सदस्य कल्लाप्पाणा भोगण, राज्यकर अधिकारी गोपाळ पाटील आदी मान्यवरांनी अभिनंदन करून कार्याला शुभेच्छा दिल्या आहेत. याशिवाय विविध संस्था व पालक वर्गातून बाबुराव वरपे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.



No comments:
Post a Comment