कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा
बेळगुंदी (ता. गडहिंग्लज) सध्या रा. गडहिंग्लज येथील सौ गीतांजली धोंडीराम पाटील यांची हॉंगकॉंग येथे दि. ९ व १० मे २०२६ रोजी होणाऱ्या आंतरराष्ट्रीय योगासन स्पर्धेसाठी निवड झाली आहे. योग विद्याधाम गडहिंग्लज च्या साधिका असलेल्या गीतांजली यांची ६५ वर्षे वयोगटा साठी या स्पर्धेत निवड झाली आहे.
त्यांनी नुकत्याच झालेल्या कोल्हापूर जिल्हा योग्य स्पर्धेत ६५ वर्षांवरील वयोगटात प्रथम क्रमांक, महाराष्ट्र योग शिक्षक संघ आयोजित स्पर्धेत तृतीय क्रमांक, महाराष्ट्र स्टेट असोसिएशन कोल्हापूर आयोजित ५० वर्षांवरील वयोगट स्पर्धेत प्रथम क्रमांक, महाराष्ट्र स्टेट असोसिएशन च्या वतीने कल्याण येथील ६५ वर्षे वरील सुपर सिक्स वयोगटात चौथा क्रमांक, नॅशनल योगासन स्पोर्ट्स असोसिएशन मार्फत तिरुअनंतपुरम (केरळ) येथील ६५ वर्षे वयोगटात द्वितीय क्रमांक पटकावला होता. शिवजयंती निमित्त मुंबई विभागाच्या वतीने मुंबई येथे भरवण्यात आलेल्या सूर्यनमस्कार स्पर्धेतही त्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले होते. या यशामुळे त्यांची हॉंगकॉंग येथील आंतरराष्ट्रीय योगासन स्पर्धेसाठी निवड झाली आहे. सेवानिवृत्तीपूर्वी त्या निट्टूर (ता. चंदगड) येथील श्री गणेश प्राथमिक विद्यामंदिरच्या मुख्याध्यापिका म्हणून काम पाहत होत्या. त्यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षिका म्हणून अनेक वर्षे चंदगड तालुक्यात सेवा बजावली होती. ग्रामीण भागात असूनही सेवानिवृत्तीनंतर त्यांनी योगाभ्यास क्षेत्रात केलेली प्रगती तरुणांनाही लाजवणारी आहे. त्यांच्या या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.

No comments:
Post a Comment