
हडलगे येथील रामा पाटील यांच्या अंगणातील अडीच फूट लांबीच्या शेंगांनी लगडल्याने चर्चेत आलेले हेच ते शेवग्याचे झाड
चंदगड : सी एल वृत्तसेवा
हडलगे (ता. गडहिंग्लज) येथील रामा तुकाराम पाटील यांच्या घरासमोरील अंगणात असलेल्या शेवग्याच्या झाडाला रेकॉर्ड ब्रेक शेंगा लागत आहेत. वर्षातून दोन वेळा शेकडोंच्या संख्येने शेंगा लागत असून सर्व शेंगांची लांबी तब्बल अडीच फूट पर्यंत आहे. जिभेवर रेंगाळणाऱ्या चवीच्या शेंगांचे इतक्या मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळत असूनही रामा पाटील व त्यांच्या पत्नी सौ आशा या शेंगांची कधीही विक्री न करता त्यांचे विना मोबदलाच वाटप करतात.
नेहमी शेंगांची लांबी सर्वसामान्य असायची तथापि यंदा सर्वच शेंगांची लांबी दोन ते अडीच फूट इतकी वाढली आहे. त्यामुळे हा गाव व परिसरात चर्चेचा विषय बनला आहे. शेंगांनी लगडलेला शेवगा पाहण्यासाठी ग्रामस्थ रामा पाटील यांच्या घरी आवर्जून भेट देत आहेत. शेवग्याच्या शेंगा विकून मिळणाऱ्या आर्थिक फायद्यापेक्षा विना मोबदला इतरांना खायला देण्यातच खरा आनंद मानणाऱ्या समाजप्रिय रामा पाटील व आशा पाटील या दांपत्याच्या चेहऱ्यावरील समाधान मात्र लपून राहत नाही.
No comments:
Post a Comment