चन्नेहट्टी-राजगोळी खुर्द (ता. चंदगड) येथील ओलम ग्लोबल ॲग्री कमोडिटीज इंडिया प्रा. लि. साखर कारखान्याच्या १७ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ उत्साहात करण्यात आला. यंदाच्या हंगामात ८ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना उच्चांकी दर देण्याचा प्रयत्न राहणार असल्याचे कारखान्याचे बिझनेस हेड टी. कन्नन यांनी सांगितले. कारखान्याचे युनिट हेड एस. राधाकृष्णन व बिझनेस हेड टी. कन्नन यांच्या हस्ते गव्हाणीमध्ये उसाची मोळी टाकून गळीत हंगामाचा प्रारंभ करण्यात आला.
यावेळी बोलताना टी. कन्नन म्हणाले, ओलम कारखान्याने नेहमीच शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून काम केले आहे. त्यामुळे चंदगड, आजरा व गडहिंग्लज सह सीमा भाग परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपला संपूर्ण ऊस ओलम कारखान्याला पाठवून सहकार्य करावे. यंदा ८ लाख मेट्रिक टन गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी ऊस तोडणी, वाहतूक, कर्मचारी आणि कारखाना प्रशासन सज्ज झाले आहे. ऊस उत्पादक शेतकरी, ऊस तोडणी कामगार, वाहतूकदार, अधिकारी व कर्मचारी हे कारखाना परिवाराचे महत्त्वाचे घटक आहेत.
ऊस उत्पादनवाढीसाठी विशेष उपक्रम
ऊस उत्पादन वाढविण्यासाठी कारखान्यामार्फत आधुनिक शेतीविषयक उपक्रमांतर्गत ‘उन्नती’ कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांना आधुनिक ऊस लागवड तंत्रज्ञान, उत्पादनवाढ आणि शेती व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
याशिवाय, नेटाफिम कंपनीच्या माध्यमातून सुमारे ५०० हेक्टर ऊस क्षेत्रावर ठिबक सिंचन योजना राबविण्यात येणार असून, यासाठी शेतकऱ्यांना अनुदान देण्याचे नियोजन आहे. तसेच यूपीएल आणि एसएमएल या कंपन्यांशी करार करून सुमारे तीन हजार ऊस उत्पादक शेतकऱ्यांना या उपक्रमांशी जोडण्यात येणार असल्याची माहिती कारखान्याचे मुख्य शेती अधिकारी सुधीर पाटील यांनी दिली.
गळीत हंगामात कारखाना सुरळीत आणि पूर्ण क्षमतेने चालावा, यासाठी आवश्यक देखभाल व दुरुस्तीच्या कामांना प्राधान्य देण्यात आले आहे. कारखान्याच्या मेंटेनन्ससाठी बिझनेस हेड टी. कन्नन यांच्या प्रयत्नातून देखभाल दुरुस्तीची कामे पूर्ण करण्यात आली असून आगामी हंगाम यशस्वी करण्यासाठी सर्व कर्मचारी आणि ओलम प्रशासन सज्ज असल्याचे युनिट हेड एस. राधाकृष्णन यांनी सांगितले.
या कार्यक्रमाला डिस्टिलरी हेड नरेंद्र रावत, एचआर प्रमुख सचिन पाटील, टेक्निकल हेड राजेश सिंग, युनियन हेड संताराम गुरव, श्रीशैल, भागोजी लांडे,अनिल पाटील, रमेश पाटील, रणजित सरदेसाई, अजित पाटील, रघुनाथ देसाई, यादव यांच्यासह ऊस उत्पादक शेतकरी, अधिकारी, ऊस तोडणी कामगार आणि वाहतूकदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्य शेती अधिकारी सुधीर पाटील यांनी केले, तर आभार नामदेव पाटील यांनी मानले.
.png)
No comments:
Post a Comment