चंदगड : सी एल वृत्तसेवा
येथील श्री कला क्रीडा सांस्कृतिक मंडळाच्या वतीने आयोजित दुर्गामाता नवरात्रोत्सवाला मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला. यंदा मंडळाच्या उत्सवाचे १८ वे वर्षानिमित्त गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. उत्सवानिमित्त दुर्गामातेची भव्य व पारंपरिक मिरवणूक काढण्यात आली.
मिरवणुकीदरम्यान पारंपरिक वाद्यांचा गजर आणि ‘दुर्गामाता की जय’च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. रवळनाथ महिला भजनी मंडळाने पारंपरिक वेशभूषेत भजनांच्या तालावर मिरवणुकीत सहभाग घेतला. त्यामुळे उत्सवाची रंगत अधिक वाढली. गावातील महिला भगिनींसह ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून मिरवणुकीत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
मिरवणुकीनंतर दुर्गामातेच्या मूर्तीची विधिवत प्राणप्रतिष्ठापना तुर्केवाडी ग्रामपंचायतीच्या सदस्या सौ. सावित्री गावडे व अमृत गावडे या दांपत्याच्या शुभहस्ते करण्यात आली. यावेळी उपस्थित भाविकांनी दुर्गामातेचे दर्शन घेतले.
श्री कला क्रीडा सांस्कृतिक युवक मंडळाच्या वतीने दरवर्षी सामाजिक बांधिलकी, एकोपा आणि पारंपरिक संस्कृती जपत नवरात्रोत्सव साजरा केला जातो. यंदाच्या उत्सवामुळे गावात भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून, विविध धार्मिक व सांस्कृतिक उपक्रमांमुळे उत्सवाची शोभा वाढणार आहे.
या प्रसंगी मंडळाचे अध्यक्ष नंदकुमार ओऊळकर, उपाध्यक्ष विनायक गावडे, सचिव अमृत मोरे यांच्यासह मंडळाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.



No comments:
Post a Comment