चंदगड / प्रतिनिधी
चंदगड ग्रामपंचायतीचा दर्जा वाढवून नगरपंचायत करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. नवीन नगरपंचायतीच्या अध्यक्ष व सदस्यांची निवड प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. या नगरपंचातीच्या नगराध्यक्ष पदाची सोडत चिठ्या टाकून काढण्याएवजी ते पद अनुसूचित जातीसाठी राखीव ठेवावे अशी मागणी तहसिलदार शिवाजी शिंदे यांना दिलेल्या निवेदनातून समाजबांधवांनी केली आहे.
चंदगड ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचायतीमध्ये होण्यापूर्वी ग्रामपंचायतीची मुदत 4 डिसेंबर 2017 संपली व निवडणूक जाहीर झाली. त्यामध्ये सरपंचपद अनुसूचित जातींसाठी आरक्षित करण्यात आले होते. मात्र संपूर्ण गावाने निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचे ठरविल्याने अनुसूचित जातीच्या मतदारांनीही निवडणूक प्रक्रियेमध्ये भाग घेतला नाही. ग्रामपंचायत स्थापनेपासून अनुसूचित जातीच्या व्यक्तीला सरपंच होण्याची प्रथमच संधी मिळाली होती. मात्र गांवातील एकी टिकवण्यासाठी मागासवर्गीयांनी त्याचा त्याग करुन संधी सोडून दिली.
अनुसूचित जातीच्या मतदारांनी सलग तीन निवडणुकांमध्ये सरपंच होण्याच्या संधीचा त्याग केला असल्याने
आमच्या त्यागाचा व भावनांचा विचार करुन नगरपंचायतीचे अध्यक्षपद अनुसूचित जातीसाठीच राखीव ठेवावे अशी मागणी निवेदनातून केली आहे. याबाबतचे निवेदन तहसलिदारांना दिले आहे. निवेदनावर एस. एम. देशमुख, श्रीकांत कांबळे, सदानंद कांबळे, सुरज कांबळे, शरद कांबळे, कुमार कोलकार, विश्वनाथ कांबळे, प्रमोद कांबळे, राजू कोलकार, गणपती कांबळे, विजय कांबळे, आकाश कांबळे, अमित कांबळे, गणपती कोलकार, रंजन कांबळे, यलाप्पा कांबळे, बाळु कांबळे, दिपक कांबळे, लक्ष्मण कांबळे, रामचंद्र कांबळे, राजेश बुदिहाळे, सल्लाउद्दीन नाईकवाडी, महम्मदहुसेन सनदी आदीच्या सह्या आहेत.
No comments:
Post a Comment