फोटो काढताना तिलारी ग्रीन व्हॅली धबधब्यात पडून तरुणाचा मृत्यू , रविवार २९ रोजी ची घटना - चंदगड लाईव्ह न्युज

29 November 2026

फोटो काढताना तिलारी ग्रीन व्हॅली धबधब्यात पडून तरुणाचा मृत्यू , रविवार २९ रोजी ची घटना

साई सुभाष शहापूरकर

चंदगड : सी एल वृत्तसेवा 

    चंदगड तालुक्यातील तिलारी नगर नजीक कोदळी गावाच्या हद्दीत हॉटेल ग्रीन व्हॅली नजीकच्या धबधब्यात पडून १८ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना आज रविवार दिनांक २९ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी घडली. साई सुभाष शहापूरकर वय १८ असे मताचे नाव आहे. याबाबतची नोंद चंदगड पोलिसात झाली असून याबाबत मयताची आई श्रीमती शुभांगी सुभाष शहापूरकर यांनी चंदगड पोलिसात वर्दी दिली आहे.

   याबाबत चंदगड पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी वर्दीदार श्रीमती शुभांगी सुभाष शहापूरकर रा. पाईपलाईनरोड विजयनगर हिंडलगा, बेळगाव या आपल्या कुटुंबातील सदस्य व नातेवाईक यांच्या सह तिलारी नगर नजीक हॉटेल ग्रीन व्हॅली धबधबा परिसरात पर्यटनासाठी आल्या होत्या. यावेळी त्यांचा मुलगा साई सुभाष शहापूरकर हा धबधब्याच्या खाली असलेल्या दगडावर सेल्फी फोटो काढण्यासाठी गेला असता त्याचा दगडावरून पाय घसरून पाण्यात पडून बुडून मृत्यू झाला. घटनेची माहिती समजतात चंदगड पोलीस ठाण्याचे पोलीस हेडकॉन्स्टेबल राजीगरे यांनी घटनास्थळी धाव घेत मयत साई याचा मृतदेह बाहेर काढून प्राथमिक तपासणी केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांच्या आदेशाने पोलीस हेडकॉन्स्टेबल जाधव करत आहेत. 

  तिलारी नगर, कोदाळी परिसरातील धबधबे, फोर वे धरण, सर्च पॉईंट, तिलारी घाट आदी ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांना अनेक वेळा स्वतःच्या सुरक्षेची काळजी घेऊन पर्यटन करावे अशा सूचना वारंवार चंदगड पोलीस ठाणे, वन विभाग चंदगड व पाटणे यांच्या वतीने दिल्या जात असूनही त्याकडे दुर्लक्ष करून पर्यटक स्वतःचा जीव धोक्यात घालत आहेत. अशा घटनांमुळे पर्यटकांच्या आनंदी रंगाचा बेरंग होतो. या घटनेतही घरातील हातात तोंडाशी आलेला कर्ता तरुण मुलगा बेपर्वाईमुळे हकनाक बळी गेल्यामुळे शहापूरकर कुटुंबावर मोठे संकट ओढवले आहे. या पुढील काळात तरी पर्यटकांनी सावधगिरी बाळगावी असे आवाहन पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे तसेच वन विभागाच्या वतीने पुन्हा करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment