![]() |
| मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना उपसरपंच देविदास गडकरी व ग्रामपंचायत अधिकारी अनिल जाधव. |
पुणे / चंदगड : सी एल वृत्तसेवा
नालंदा ऑर्गनायझेशन संस्था ‘सन्मान मंच’ यांच्या वतीने आयोजित ‘राज्यस्तरीय ग्रामसमृद्धी सन्मान सोहळा २०२६’ मध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत मिरवेल, पारगड, नामखोल या ग्रामपंचायतीला प्रतिष्ठेच्या ‘आदर्श ग्रामपंचायत’ पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले. तसेच ग्रामविकासातील उल्लेखनीय कार्याबद्दल उपसरपंच देविदास गंगू गडकरी यांना ‘आदर्श उपसरपंच तर अनिल सुरेश जाधव यांना ‘आदर्श ग्रामपंचायत अधिकारी’ या पुरस्कारांने गौरविण्यात आले.
पुण्यातील नवी पेठ येथील पत्रकार भवन येथे नुकताच हा भव्य सन्मान सोहळा संपन्न झाला. नालंदा ऑर्गनायझेशन संस्थेच्या वतीने राज्यभरातील ग्रामपंचायतींच्या विकासकामांचे सर्वेक्षण करण्यात आले होते. या सर्वेक्षणामध्ये मिरवेल, पारगड व नामखोल ग्रुप ग्रामपंचायतीने राबवलेले विविध लोककल्याणकारी उपक्रम, पारदर्शक कारभार आणि गावाच्या सर्वांगीण विकासासाठी केलेली उत्कृष्ट कामगिरी अधोरेखित झाली. याची दखल घेत निवड समितीच्या वतीने सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
या राज्यस्तरीय पुरस्कारामुळे चंदगड तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला असून, ग्रामस्थ व विविध स्तरांतून ग्रामपंचायत प्रशासन, उपसरपंच देविदास गडकरी आणि ग्रामपंचायत अधिकारी अनिल जाधव यांचे अभिनंदन होत आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या चंदगड तालुक्यातील अतिदुर्गम पारगड किल्ला परिसरातील छोट्याशा तीन गावातील ग्रामस्थांनी जागरूक राहून केलेल्या खडतर परिश्रमाचे हे फलित म्हणावे लागेल.

No comments:
Post a Comment