एकाच दिवसात 'चंदगड' मधील चार लघु पाटबंधारे प्रकल्प ओव्हरफ्लो - चंदगड लाईव्ह न्युज

18 July 2022

एकाच दिवसात 'चंदगड' मधील चार लघु पाटबंधारे प्रकल्प ओव्हरफ्लो

किटवाड नंबर १ धरणाच्या सांडव्यातील झिगझॅग भिंतीवरून पडणारे ओव्हर फ्लोचे पाणी.

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा 

             काल एका दिवसात चंदगड उपविभागातील पाच लघु पाटबंधारे तलाव ओव्हर फ्लो झाले. यात कळसगादे, किटवाड नं. १, कुमरी, काजिर्णे व सुंडी येथील धरणांचा समावेश आहे. अशी माहिती चंदगड पाटबंधारे उपविभागीय अधिकारी यांनी दिली आहे.

             चंदगड उपविभागात जंगमहट्टी, घटप्रभा नदीवरील फाटकवाडी, ताम्रपर्णी नदीवरील झांबरे- उमगाव हे ३ मध्यम प्रकल्प तर १६ लघुपाटबंधारे प्रकल्पासह एकूण २३ प्रकल्प आहेत. गेल्या तीन वर्षातील महापूर पाहता खबरदारीचा उपाय म्हणून यंदा सर्वच तलावातील बहुतांशी पाणी एप्रिल ते जून महिन्यात सोडून देण्यात आले होते. त्यामुळे पावसाळ्याच्या सुरुवातीस सर्वच धरणांमध्ये २५ टक्केच्या आसपास पाणीसाठा शिल्लक होता. जून महिन्यात मृग नक्षत्राने दडी मारल्यामुळे यंदा धरणे लवकर भरणार नाहीत किंबहुना पूर्ण पावसाळ्यात भरतील की नाही अशी धारणा होती. 

            मात्र गेल्या पंधरा-वीस दिवसांतील संततधार पावसामुळे फाटकवाडी व झांबरे हे मध्यम तर कळसगादे हा लघु प्रकल्प ९ जुलै पूर्वीच ओव्हरफ्लो झाले होते. तर काल रविवारी १७ जुलै रोजी सकाळी कुमरी, किटवाड नं. १, काजिर्णे व सुंडी असे आणखी चार प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत.  परिणामी ताम्रपर्णी नदीच्या पाणी पातळीत यापुढील पावसाळ्यात अधिक वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संभाव्य पूर बाधित क्षेत्रातील नागरिक, व्यापारी यांनी जीवित व वित्त हानी होणार नाही यासाठी सतर्क राहावे. गोठ्यातील जनावरे सुरक्षित ठिकाणी हलवावीत. असे आवाहन गडहिंग्लज उपविभागीय तथा प्रांत अधिकारी बाबासाहेब वाघमोडे, तहसीलदार विनोद रणवरे गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांनी प्रशासनाच्या वतीने केले आहे.

No comments:

Post a Comment