कालकुंद्री येथे 'वाघ चावडा' यात्रा उत्साहात - चंदगड लाईव्ह न्युज

18 July 2022

कालकुंद्री येथे 'वाघ चावडा' यात्रा उत्साहात

'वाघ चावडा' यात्रेनिमित्त कालकुंद्री येथे बनवण्यात आलेल्या वाघाच्या प्रतिकृती

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा

          कालकुंद्री (ता. चंदगड) येथे 'वाघ चावडा' ची यात्रा काल १७ जुलै रोजी उत्साहात पार पडली. आषाढ महिन्याच्या उत्तरार्धातील रविवारी दरवर्षी संपन्न होणारी ही एक वैशिष्ट्यपूर्ण यात्रा आहे. यात्रेला सुमारे एक हजार वर्षांची परंपरा असल्याचे सांगितले जाते. पूर्वीच्या काळी कालकुंद्री गावाचा परिसर जंगलांनी वेढलेला होता. जंगलांमध्ये वाघ, अस्वल ,लांडगे आदी हिंस्त्र पशू पासून ग्रामस्थांना उपद्रव व्हायचा. 

           वाघाने गावातील पशुधन गाय, म्हैस, बैल, शेळ्या, मेंढ्या, कुत्रा आदी पाळीव पशुंना इजा करू नये यासाठी गावकुसाबाहेर वाघाची  मुर्ती तयार करून त्याची नैवेद्य दाखवून मनोभावे पूजा केली जायची. तीच परंपरा शेकडो वर्षापासून आजतागायत जपली जाते. परंपरेनुसार गावातील कोलकार ने लाकूड आणून  दिल्या नंतर त्यापासून गावचे सुतार  वाघाच्या दोन लाकडी प्रतिकृती बनवतात. त्याची स्थापना या दिवशीही गावाबाहेर असलेल्या गणपती मंदिरासमोर व गावच्या सीमेवर केली जाते. 

          या दिवशी गाव पाळक करून सायंकाळच्या वेळी अनेक सुवासीनी गोडा नैवेद्य दाखवून वाघोबाची पूजा करतात. परंपरेनुसार गाऱ्हाणे घातले जाते. सायंकाळी पूजन प्रसंगी गावातील सात पाटील घराण्यापैकी यंदाचे हक्कदार जयवंत लक्ष्मण पाटील यांनी गार्‍हाणे घातले. यावेळी यात्रेचे हक्कदार उत्तम कोळी, संगीता कोळी यांचे सह कोलकार संजय कांबळे, शिल्पकार मारुती दत्तू सुतार, नरसु वर्पे, शंकर गोंधळी, सदाशिव परीट, आसद शेख, इरफान मोमीन यांच्यासह ग्रामस्थ व भाविक मोठ्या संख्येने हजर होते. याकामी तानाजी गोपाळ पाटील यांचे सहकार्य लाभले.

No comments:

Post a Comment