संपत पाटील - चंदगड / सी. एल. वृत्तसेवा दि. 13-2-2026
विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण व्हावी आणि अद्ययावत ज्ञान त्यांच्यापर्यंत पोहोचावे, या उद्देशाने चंदगड येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालयाचे ग्रंथालय व माहिती केंद्र आणि बेस्ट बुक सप्लायर यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. पुस्तकांच्या या अनोख्या विश्वाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. एस. डी. गोरल यांच्या शुभहस्ते अत्यंत उत्साही वातावरणात संपन्न झाले. यावेळी बोलताना प्राचार्यांनी ग्रंथ हेच मानवाचे खरे मित्र असून समृद्ध जीवन जगण्यासाठी वाचन संस्कृती जोपासणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला ग्रंथालय व माहितीशास्त्र विभागाचे प्रमुख प्राध्यापक रा. सु. गडकरी यांनी आपल्या प्रास्ताविकातून प्रदर्शनाची भूमिका मांडली. त्यांनी ग्रंथालयातील विविध उपक्रमांची माहिती देत हे प्रदर्शन विद्यार्थ्यांसाठी ज्ञानाची मोठी कवाडं उघडणारं ठरेल, असा विश्वास व्यक्त केला. या सोहळ्याचे औचित्य साधून 'बेस्ट बुक सप्लायर'चे प्रतिनिधी सुहास माने, राहुल नाईकनवरे आणि योगेश तोडकर यांचे महाविद्यालयाच्या वतीने स्वागत करण्यात आले. प्रदर्शनात विविध विषयांवरील नामवंत लेखकांची पुस्तके, स्पर्धा परीक्षांचे साहित्य आणि कथा-कादंबऱ्यांची मोठी रेलचेल पाहायला मिळाली.
या प्रदर्शनाप्रसंगी डॉ. एस. एस. सावंत,डॉ. एस. एन. पाटील, डॉ. एस. डी. गावडे, डॉ. एन. के. पाटील, प्राध्यापक व्ही. के. गावडे, डॉ. राजकुमार तेलगोटे, प्राध्यापक एस. व्ही. कुलकर्णी, प्रा. ए. डी. कांबळे, डॉ आर. के. सूर्यवंशी, डॉ.ए. वाय. जाधव, वीरधवल मुळीक आणि एम एम पिरजादे यांसह महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन आणि उपस्थितांचे आभार डॉक्टर एन. एस. मासाळ यांनी मानले. दिवसभर चाललेल्या या प्रदर्शनाला विद्यार्थ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला, ज्यामुळे महाविद्यालयाचे प्रांगण ज्ञानमयी ऊर्जेने न्हाऊन निघाले होते.

No comments:
Post a Comment