महादेवराव वांद्रे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या कबड्डी संघाला कोल्हापूर झोनल स्पर्धेत द्वितीय क्रमांक - चंदगड लाईव्ह न्युज

15 October 2026

महादेवराव वांद्रे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या कबड्डी संघाला कोल्हापूर झोनल स्पर्धेत द्वितीय क्रमांक

 


तुर्केवाडी :  सी. एल. वृत्तसेवा

     डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाच्या (DBATU) अंतर्गत दिनांक ९ ऑक्टोबर २०२६ रोजी अशोकराव माने, पेठवडगाव येथे आयोजित कोल्हापूर झोनल कबड्डी स्पर्धेत तुर्केवाडी (ता. चंदगड) येथील महादेवराव वांद्रे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या कबड्डी संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत द्वितीय क्रमांक पटकावला.

    या स्पर्धेत महाविद्यालयाच्या संघाने जिद्द, चिकाटी आणि सांघिक भावनेच्या जोरावर अंतिम फेरीपर्यंत मजल मारली. अंतिम सामना अत्यंत अटीतटीचा झाला. खेळाडूंनी विजयासाठी शेवटपर्यंत शर्थीचे प्रयत्न केले; मात्र काही गुणांच्या फरकाने विजय हुकल्याने संघाला द्वितीय क्रमांकावर समाधान मानावे लागले. संघाच्या या कामगिरीमुळे महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

    या संघाला प्रशिक्षक सागर पाटील आणि  क्रांती कांबळे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे खेळाडूंना स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी प्रेरणा मिळाली.

    या यशाबद्दल द महाराष्ट्र एज्युकेशन अँड स्पोर्ट्स अकॅडमीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. महादेवराव वांद्रे यांनी संघाचे अभिनंदन करून खेळाडूंना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच संस्थेचे प्रतिनिधी अमेय वांद्रे, बी.एड. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. जी. खाडे, गणपत प्रधान, फार्मसी विभागप्रमुख अनुज शिंदे तसेच महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी खेळाडूंचे अभिनंदन व कौतुक केले.

संघातील खेळाडू : कर्णधार अजय मेणसे, प्रसाद गोरल, हुजेफा पेंढारी, साहिल पाटील, ओंकार ठावरे, रोहित पाटील, तेजस आपके, रोहित चाळक, श्रेयस कांबळे, यश शिंदे,‌ अमोल हेळवे. यासर्व खेळाडूंचे व कबड्डी संघाचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!

No comments:

Post a Comment