सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल माजी मंत्री डॉ. दशरथ भांडे यांना ‘आदिवासी कोळी भूषण’ पुरस्काराने सन्मानित - चंदगड लाईव्ह न्युज

17 November 2026

सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल माजी मंत्री डॉ. दशरथ भांडे यांना ‘आदिवासी कोळी भूषण’ पुरस्काराने सन्मानित

 

डॉ. दशरथ भांडे, माजी कॅबिनेट मंत्री यांच्यावतीने "आदिवासी कोळी भूषण " पुरस्कार स्विकारताना प्रा. बसवंत पाटील, माजी विभागीय अध्यक्ष, पश्चिम महाराष्ट्र, आदिवासी संघर्ष समिती, महाराष्ट्र राज्य...

सांगली : सी. एल. वृत्तसेवा

    महर्षी वाल्मिकी चॅरिटेबल ट्रस्ट, सांगली यांच्या वतीने बिरसा मुंडा जयंतीनिमित्त आयोजित २५ व्या आदिवासी कोळी महादेव जमात वधू-वर मेळाव्यात माजी कॅबिनेट मंत्री डॉ. दशरथ भांडे यांना सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल ‘आदिवासी कोळी भूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. १५ नोव्हेंबर रोजी हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.  प्रकृती अस्वास्थ्यामुळे डॉ. भांडे कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत. त्यांच्या वतीने डॉ. डी. एम. भांडे प्रणित आदिवासी संघर्ष समिती, महाराष्ट्र राज्यचे माजी पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष प्रा. बसवंत पाटील यांनी पुरस्कार स्वीकारला.

    कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे संस्थापक एकनाथ सूर्यवंशी यांनी केले. सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे नूतन संचालक वैभव शिंदे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सत्काराला उत्तर देताना प्रा. बसवंत पाटील यांनी डॉ. भांडे यांनी महाराष्ट्र कायदा २३/२००० विधानसभेत संमत होताना तीन तासांहून अधिक काळ केलेल्या अभ्यासपूर्ण भाषणातील काही महत्त्वपूर्ण मुद्दे उपस्थितांसमोर मांडले.

यावेळी आदिवासी संघर्ष समिती आणि आदिवासी कोळी महासंघाच्या २०२५-२६ मधील सर्व कार्यकारिण्या बरखास्त करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. तालुका स्तरापासून राज्य स्तरापर्यंत नव्याने नियुक्त्या करण्यात येणार असून, इच्छुक जमात बांधवांनी आपली नावे सरचिटणीस प्रशांत तारळे यांच्याकडे नोंदवावीत, असे आवाहन प्रा. पाटील यांनी केले.

प्रमुख पाहुणे वैभव शिंदे म्हणाले, "आरक्षणाबाबत सर्व समाजांची परिस्थिती सारखीच आहे. आपले संवैधानिक हक्क हिरावले जात असतील, तर त्याचा एकजुटीने मुकाबला करणे आवश्यक आहे."

या मेळाव्यात सामाजिक आणि वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केलेल्या समाजबांधवांचाही सन्मान करण्यात आला. वधू-वर मेळाव्याला युवक-युवतींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. राजमाने यांनी केले.

No comments:

Post a Comment