जक्कनहट्टी ग्रामस्थांचा बहिष्काराचा निर्णय अखेर मागे, प्रांताधिकारी व तहसिलदार यांच्या मध्यस्थीने तोडगा - चंदगड लाईव्ह न्युज

20 April 2019

जक्कनहट्टी ग्रामस्थांचा बहिष्काराचा निर्णय अखेर मागे, प्रांताधिकारी व तहसिलदार यांच्या मध्यस्थीने तोडगा

जक्कनहट्टी (ता. चंदगड) येथे महिला ग्रामस्थांसोबत प्रांताधिकारी विजया पांगारकर. 
कोवाड / प्रतिनिधी
जक्कनहट्टी (ता. चंदगड) ग्रामस्थांनी लोकसभा निवडणुकीवर टाकलेला बहिष्काराचा निर्णय आज मागे घेतला. प्रांताधिकारी विजया पांगारकर यांच्या मध्यस्थीनंतर ग्रामस्थांनी बहिष्काराचा निर्णय मागे घेतला. यावेळी तहसिलदार विनोद रणावरे, मंडल अधिकारी दयानंद पाटील, तलाठी दिपक कांबळे उपस्थित होते. बहिष्काराचा निर्णय मागे घेण्यासह ग्रामस्थांनी शंभर टक्के मतदान करुन आदर्श मतदान केंद्र करण्याचे ग्रामस्थांनी प्रशासनाला आश्वासन दिले. 
जक्कनहट्टी ग्रामस्थांनी लोकसभा व विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता. 28 मार्चे 2019 रोजी या संदर्भात प्रशासनाला निवेदन दिले होते. त्या अनुषंगाने तहसिलदार श्री. रणावरे यांनी 17 एप्रिल 2019 रोजी ग्रामस्थांची भेट घेऊन बहिष्कार मागे घेण्याचे आवाहन केले होते. पण रस्त्याच्या मागणीवर ग्रामस्थ ठाम राहिल्याने आज प्रांताधिकारी पांगारकर यांनी गावात जाऊन ग्रामस्थांची भेट घेतली. त्या ठिकाणच्या गावकऱ्यांच्या अडचणी व समस्या समजून घेतल्या. आचारसंहितेननंतर रस्त्याचा प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन दिल्याने ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेत असल्याचे जाहीर केले. त्यामुळे जक्कनहट्टी ग्रामस्थांचा मतदानाचा मार्ग मोकळा झाला आहे. 
जक्कनहट्टी ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतल्याची माहीती मिळताच विविध राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी ग्रामस्थांच्या भेटी घेवून मतदान करण्याचे आवाहन केल्याचे समजते. पण ग्रामस्थांनी चर्चेतून मार्ग काढण्याचे ठरविल्याने प्रचारकांना माघारी फिरावे लागले.

No comments:

Post a Comment