माणगांवच्या युवकांचा असाही प्रामाणिकपणा, सापडलेले आठ हजार रुपये मालकाला शोधून केले परत - चंदगड लाईव्ह न्युज

20 April 2019

माणगांवच्या युवकांचा असाही प्रामाणिकपणा, सापडलेले आठ हजार रुपये मालकाला शोधून केले परत

पाटणे फाट्यावर सापडलेले पैसे अर्जुन कांबळे यांना परत करताना लक्ष्मण, विजय, तानाजी व अरूण
तेऊरवाडी / प्रतिनिधी
पाटणे फाटा (ता. चंदगड) येथे रस्त्यावरती सापडलेले नऊ हजार रुपये माणगांवच्या चार युवकानी मूळ मालकाला प्रामाणिकपणे परत केल्याने त्या चार युवकांच्या प्रामाणिकपणाबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.
माणगाव येथील लक्ष्मण ससेमारी, तानाजी शिंदे,विजय सोनार आणि अरूण चिंचणगी हे चार मित्र पाटणे फाटा परिसरात  गेले असताना तेथे त्याना रस्त्यावर अनपेक्षितपणे एक साध्या प्लॅस्टिक पिशवीत गुंडाळलेल्या अवस्थेत मिळाली . त्यामध्ये काय आहे ते पाहिले असता त्या पिशवीत पाचशेच्या नोटांचे बंडल होते. प्लॅस्टिक पिशवीत घड्या घातलेल्या त्या नोटा पाहिल्यावर ते पैसे कुठल्यातरी गरीब व गरजू व्यक्तीचेच असावेत असा अंदाज त्या चारही मित्रानी बांधला. खर तर मोठी रक्कम या युवकांना सापडली होती आणि त्याचा मालकही जवळ नव्हता. मनात आणले असते तर जवळच्या मोठया हॉटेलमध्ये ते पैसे उडवले असते. पण न करता या चौघांनी पैसे मालकाचा दोन तास शोध घेतला. त्या चौघानी आजूबाजूच्या दुकानदारांना त्याबाबत विचारायला सुरुवात केली. पण कोणाकडूनही आश्वासक अशी माहिती मिळाली नाही. थोडा वेळ प्रतीक्षा करत ते सर्वजन तेथेच थांबले . तितक्यात एक साठ- पासष्ठ वर्षांची वयोवृद्ध व्यक्ती धापा टाकत जिवाच्या आकांताने  ओरडत काहीतरी शोधत  समोरून येत असलेली त्यांना दिसली. ती व्यक्ती दिसेल त्या व्यक्तीला काहीतरी विचारात होती. त्याच्या चेहऱ्यावर खूपच चिंतेचे आणि भीतीचे भाव दिसत होते. शेवटी  राहवले नाही म्हणून हे सर्वजन त्यांच्याजवळ जाऊन शांतपणे त्यांची विचारपूस केली. मी अर्जुन कांबळे असून  पेशाने टेलर आहे. बसर्गे (ता. चंदगड) येथील रहिवाशी असून आठ हजार रुपये हरवल्याचे सांगितले. चौकशी नंतर समजले की ते हरवलेले पैसे या व्यक्तीचेच आहेत.  त्यांना शांतपणे बाजूला घेवून त्यांचे पैसे त्यांना सन्मानपूर्वक परत केले. हरवलेले पैसे जे पुन्हा परत मिळतील याची त्यांनी अपेक्षाही केली नव्हती ते त्यांना परत मिळाले. ती व्यक्ती खूप आनंदीत झाली आणि त्याने कृतज्ञतापूर्वक या चार मित्रांचे आभार मानले. या चार मित्रानाही  त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून समाधान वाटले. हरवलेले पैसे मिळाल्यानंतर त्या व्यक्तीला जेवढा आनंद झाला त्याहून कितीतरी पटीने जास्त आनंद या सर्वाना त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरचं समाधान पाहून झाला होता. आज काहीतरी चांगले आपल्या हातून घडले असा विचार करून या  सर्वांनी त्या व्यक्तीचा अगदी चहाचा कप सुद्धा न घेता निरोप घेतला. आज दुपारी घडलेल्या या घटनेची चर्चा दिवसभर माणगांव परिसरात होती.

No comments:

Post a Comment