निट्टूर मधील पांडव कालीन विहिरीची ज्येष्ठ मंडळीकडून सफाई - चंदगड लाईव्ह न्युज

20 June 2019

निट्टूर मधील पांडव कालीन विहिरीची ज्येष्ठ मंडळीकडून सफाई

निटुर (ता. चंदगड) येथील नरसिंह देवालयाच्या पिछाडीस पुरातन विहिरीतील गाळ काढताना ज्येष्ठ नागरिक संघटनेचे सदस्य. सोबत सरपंच अमोल सुतार व इतर. 
कालकुंद्री / प्रतिनिधी
निट्टूर (ता. चंदगड) नजीकच्या डोंगरकपारीतील गुहेत वसलेल्या पांडवकालीन ग्रामदैवत नरसिंह मंदिरालगत असलेल्या पुरातन विहीरीची सफाई गावातील ज्येष्ठ नागरिकांनी करून तरुणांसमोर आदर्श ठेवला आहे.
सेवा निवृत्ती नंतरचे आयुष्य नातवंडात आरामात घालवण्याच्या किंवा गावातील एखाद्या सार्वजनिक कट्ट्यावर बसून गप्पा हाणण्याच्या काळात निटूर मधील ज्येष्ठांचे उपक्रम तरुणाईला लाजवणारे आहेत. आधार बहुउद्देशीय ज्येष्ठ नागरिक संघ या नावाखाली आरोग्य शिबिरे, शेतकरी मेळावे, महिलांसाठी विविध विषयावरील व्याख्याने, व्यसनमुक्ती, आदर्श पुत्र, श्रावण बाळ उच्चशिक्षित व उच्चपदस्थांचे सत्कार आदी उपक्रम आयोजनाने वेगळे स्थान निर्माण केले आहे. दुष्काळामुळे पुरातन विहीर शेकडो वर्षे श्री नरसिंहाच्या भाविकांची तहान भागवत होती. तथापि विहिरीत वाढलेली झुडपे व गाळामुळे विहीरीला अवकळा आली होती. याकडे कुणाचेच लक्ष नव्हते. त्यामुळे या वृध्दांनी विहीरीची स्वच्छता केल्याने विहिरीने मोकळा श्वास घेतला. याबाबत भाविकांत समाधान व्यक्त होत आहे. या कामी संघटनेचे सदस्य के. एन. पाटील, जे. एस. पाटील, आर. व्ही. पाटील, सुबराव पाटील, हनुमंत कल्लाप्पा पाटील, शंकर रेमजी कांबळे, गणपत नाईक आदींनी भाग घेतला. त्यांना सरपंच अमोल सुतार, उपसरपंच सचिन पाटील, गावचे पोलीस पाटील, यल्लाप्पा पाटील यांची साथ मिळाली.

No comments:

Post a Comment