बळीराजाला पावसाची प्रतिक्षा, पावसाच्या आशेवर शिवारात पेरणीची धांदल - चंदगड लाईव्ह न्युज

20 June 2019

बळीराजाला पावसाची प्रतिक्षा, पावसाच्या आशेवर शिवारात पेरणीची धांदल

अलबादेवी (ता. चंदगड) येथे पावसाच्या आशेवर भुईमुग पेरणी करत असलेले शेतकरी कुटुंब. (छायाचित्र - श्रीकांत नेवगे, अलबादेवी)
चंदगड / प्रतिनिधी
जून महिना संपत आला तरी अद्यापही मान्सुन पाऊस दाखल न झाल्याने शेतकरी वर्ग चिंतेत पडला आहे. सर्वानाच आता मान्सुनच्या आगमनाची प्रतिक्षा लागली आहे. धुळवाफ पेरणी झाल्यानंतर सद्या भुईमुग पेरणीला वेग आला आहे. तालुक्यात ठिक-ठिकाणी अधून-मधून पावसाच्या हलक्या सरी कोसळत असल्याने शेतकरी पेरणीची कामे उरकण्यात दंग आहे. पुढील काळात मान्सुन सक्रीय होईल या आशेवर शेतकऱ्यांनी पेरणीचे नियोजन केले आहे. गेले काही दिवस वातावरणात कमालीचा गारवा जाणवत असल्याने रुग्णांच्या संख्येतही दिवसेनदिवस वाढ होताना दिसत आहे. 
चंदगड तालुक्याच्या भौगोलिक विविधता आहे. तालुक्यात पावसाचे प्रमाण अधिक असले तरी तालुक्याचया पूर्व भागात हे प्रमाण पश्चिम भागाच्या जवळपास निम्मे असते. मात्र पूर्व भागातील माती काळी व पाणी धरुन ठेवणारी असल्याने कमी पावसातही तेथील पिके चांगली येतात. पूर्व भागातील माती लालसर असल्याने या मातीला अधिक पावसाची गरज असते. अलबादेवी (ता. चंदगड) परिसरात आज मान्सूनपूर्व पावसाच्या हलक्या सरी पडल्यामुळे या भागातील बळीराजा सुखावला आहे. पाऊस येणार या आशेवर या परिसरातील शेतकरी भुईमूग पेरणीच्या कामात दंग असून ही पेरणी सद्या अंतिम टप्प्यात आली आहे. जवळपास नदी नसल्यामुळे पाण्याचा अभाव यामुळे ऊस पिकासह इतर उन्हाळी पिकांचे उत्पादन कमी प्रमाणात आहे. या  भागातील शेतकरी भात, नाचणी सह भुईमूग पावसाळी मिरची, दिडगे अशी कडधान्यांची पिके घेतो. त्याचबरोबर या पिकांचे हत्ती व गव्यासारख्या जंगली प्राण्यापासून रक्षण करताना शेतकऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागते. जून महिना संपत आला तरी अजूनही पावसाने हुलकावणी दिल्यामुळे बळीराजा चिंतेत आहे.

No comments:

Post a Comment