पारगड येथे शिवराज्याभिषेक सोहळा साधेपणाने संपन्न - चंदगड लाईव्ह न्युज

06 June 2020

पारगड येथे शिवराज्याभिषेक सोहळा साधेपणाने संपन्न

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मास्क व सोशल डिस्टनसिंगचे काटकोप पालन, पारगड ग्रामस्थ व मजरे कार्वे येथील शाहिद जवान वेलफेअर फौंडेशन यांच्या वतीने सोहळा साजरा
पारगड (ता. चंदगड) येथे शिवराज्यभिषेक सोहळ्यावेळी उपस्थित मान्यवर. 
कोवाड / सी.एल.वृत्तसेवा
         मजरे कार्वे (ता. चंदगड) येथील शहीद जवान वेलफेअर फौंडेशन, शिवनेरी क्रीडा व सांस्कृतिक मंडळ व पारगड ग्रामस्थांच्या वतीने किल्ले पारगड येथे दरवर्षी 6 जून रोजी भव्य दिव्य स्वरूपात होणारा शिवराज्याभिषेक सोहळा या वर्षी साधेपणाने साजरा करण्यात आला.
      संपूर्ण  जगासह भारतभर कोवीड 19 च्या महामारीमुळे प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. याचा मोठा धोका महाराष्ट्राला पोहचला आहे.यामुळे केंद्र शासनाच्या आदेशाने महाराष्ट्र शासनाने संचारबंदी लागू केली आहे. महाराष्ट्रात कोणतेही धार्मिक कार्यक्रम, सार्वजनिक कार्यक्रम घेण्यास बंदी घातली आहे.त्याच अनुषंगाने दरवर्षी  रायगडासह अनेक ठिकाणी मोठया उत्साहात होणारा शिवराज्याभिषेक सोहळा यावर्षी साधेपणाने साजरा करण्याचे युवराज संभाजीराजे  यांचे नियोजन सुरू होते. त्या अनुषंगाने आज चंदगड तालुक्यातील किल्ले पारगड या ठिकाणी हा सोहळा ठराविक मान्यवर व ग्रामस्थांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला.
        यावेळी कोरोनाचा प्रसार वाढू नये, कोरोनाची साखळी तोडणे यासाठी सामाजिक अंतर राखणे, मास्क चा वापर करणे इ. बाबीचे कटाक्षाने पालन करण्यात आले.  सुरुवातीला गडाच्या पायऱ्याचे पूजन ग्रामपंचायत सदस्य दिलीप परीट यांच्या हस्ते करण्यात आले. निवृत्ती हारकारे व नारायण गडकरी यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले.त्यांनतर शिवप्रेमी पराग निट्टूरकर यांच्या सह उपस्थितांनी केलेल्या जय भवानी, जय शिवाजी च्या जयघोषात भंडारा उधळण करत शिव प्रतिमेला जलाभिषेक करण्यात आला.पुष्पहार अर्पण करून मंडळाचे अध्यक्ष पांडुरंग बेनके यांच्या हस्ते शिवप्रतिमेचे पूजन करण्यात आले.तदनंतर भवानी मंदिरात आरतीचा कार्यक्रम पार पडला.अशा रीतीने लॉकडाऊन च्या सर्व नियमांचे पालन करत अगदी साधेपणाने यावर्षीचा शिव राज्याभिषेक सोहळा पार पडला यावेळी रघुनाथ गावडे,जयसिंग बेनके,दिलीप कदम,सचिन मालुसरे,प्रकाश चिरमुरे,गोविंद कांबळे यांच्यासह पारगड गावातील ग्रामस्थ व युवक वर्ग उपस्थित होते.

No comments:

Post a Comment